Sunetra Pawar: भीमाशंकर परिसराचा चेहरामोहरा बदलणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंचरमध्ये दिलं मोठं आश्वासन
Sunetra Pawar: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी सुनेत्रा पवारांचे स्वागत; धार्मिक पर्यटनातून स्थानिक आदिवासींना रोजगार देण्याचा संकल्प.

Sunetra Pawar – सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. पर्यावरणाचा समतोल राखत भाविकांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच दुर्गम आदिवासी भागाच्या विकासाला चालना देण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रविवार, दि.१४ रोजी केले.
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनाच्या अगोदर मंचर येथे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आल्या असता त्यांचा सन्मान माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शैलजा शिवाजीराव ढोबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, भीमाशंकर विकास आराखड्याचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील १४८ कोटी रुपयांची कामे पूर्णत्वास आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात २८८ कोटी रुपयांच्या निधीतून निगडाळे येथे वाहनतळ, भक्तनिवास, बस सुविधा,भीमाशंकर बसस्थानक, दर्शनबारी मार्ग, खेड-भीमाशंकर रस्ता तसेच विविध मंदिरांच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. अलीकडेच मंजूर झालेल्या तिसऱ्या टप्प्यासाठी १७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यामध्ये भीमाशंकर गावाचा पुनर्विकास,
मंदिर परिसरातील पायाभूत सुविधा आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा समावेश आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या विकास आराखड्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी चांगला पाऊस पडून राज्यातील शेतकरी सुखी व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी श्री भीमाशंकर चरणी केल्याचे सांगितले.





