Pune District : भोर तालुक्यातील एमआयडीसीसाठी सुनेत्रा पवार आक्रमक
Pune District : याची दखल घेत संबंधित जागेच्या ठिकाणी एमआयडीसी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तत्परतेने विधान भवनात बैठक घेतली.

भोर : भोर तालुक्यात एमआयडीसी व्हावी या उद्देशाने १९९२ साली तालुक्यातील उत्रौली-वडगाव परिसरात २१३. ३३ हेक्टर जमीन संपादित केली होती. परंतु शासनाने संबंधित भूसंपादित जमीन १६ जुन २०२६ ला रद्द केली आहे. याची दखल घेत संबंधित जागेच्या ठिकाणी एमआयडीसी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी तत्परतेने विधान भवनात बैठक घेतली.
यादरम्यान एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पुण्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी तसेच भोर तालुक्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उत्रौली-वडगाव एमआयडीसीबाबत नव्याने नोटिफिकेशन काढून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल अशा पद्धतीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नवीन दर ठरवून नव्याने मिळणाऱ्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व एमआयडीसी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रधान सचिव राजेश देशमुख, व्हिडीओ काॅन्फरन्सींगद्वारे (व्हि. सी) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, व्हि. सीद्वारे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनिषा संतोष कंक, उपसभापती विशाल कोंडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण जगदाळे, विक्रम खुटवड, भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष घोरपडे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, झेडपीचे माजी सदस्य चंद्रकांत बाठे, भोर नगरपालिकेचे नगरसेवक केदार देशपांडे, कुणाल धुमाळ, अनिल भेलके उपस्थित होते.
भोर तालुक्यात रोजगाराची बिकट अवस्था असून मी मागील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पाहिले आहे. भोरमध्ये एमआयडीसी होणे गरजेचे असून तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याने एमआयडीसीसाठी जे प्रयत्न करावे लागतील ते केले पाहिजे.
-सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री.





