Sunetra Pawar – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड झाली. संस्थेच्या पौड रोड येथील मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. संस्थेच्या 85 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळाला. तथापि वीस वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अजित पवार यांनी संस्थेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीत गुणवत्तेच्या शिखरावर पोचविले. अठ्ठावीस जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संस्थेचे अध्यक्षपद रिक्त राहिले होते. रविवारी (दि. 1 मार्च) संस्था सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात झाली. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम अजित पवार, विमानात असलेले अंगरक्षक तसेच वैमानिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी मांडला. त्यास सर्व सभासदांनी अनुमोदन दिले. त्यानुसार उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केली. सप्टेंबर 2006 मध्ये अजित पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शैक्षणिक आणि गुणात्मक विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले. संस्थेच्या सर्व शाखांच्या इमारती अद्ययावत सोई-सुविधायुक्त केल्या. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अविष्कार गुणवर्धन, डीजीटल स्टुडीओद्वारे ऑनलाईन अध्यापन, कॉग्नेटिव्ह एक्सचेंज, लिड टू एक्सेल, अटल टिंकरींग लॅब, बीआयएस, विद्यार्थी समुपदेशन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संशोधन प्रोत्साहन कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, तंज्ञांची व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे, औद्योगिक भेटी, विद्यार्थी अपघात विमा योजना असे विविध उपक्रम सुरू केले. काळाची गरज ओळखून त्यांनी ठिकठिकाणी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या खेळाला वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय क्रिडामहोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्यांच्या या उपक्रमामुळे संस्थेच्या दहावी, बारावीचा निकाल पुणे जिल्हा, पुणे विभाग तसेच राज्याच्या तुलनेत जास्त असतो. अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहेत. कला, क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पदके मिळविली आहेत. परदेशातील नामांकित विद्यापीठांबरोबर केलेल्या संशोधन, शैक्षणिक कराराचा विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना उपयोग होतो. यावेळी संस्थेचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांच्यासह संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते. संस्थेचा डोलारा संस्थेच्या जिल्ह्यात 16 पूर्व प्राथमिक, 16 प्राथमिक, 56 माध्यमिक, 31 उच्च माध्यमिक शाळा आहेत. 23 ठिकाणी व्यवसाय अभ्यासक्रम कोर्सेस चालू आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान विभाग असलेली आठ पारंपारिक महाविद्यालये आहेत. तसेच फार्मसी पदविकेची तीन, पदवीची तीन, एमबीएची दोन, लॉ, आयुर्वेद, इंजिनिअरींग आणि आर्किटेक्टचे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. या विविध शाखांतून 84 हजार 64 विद्यार्थी शिक्षण घेत असून 3 हजार 697 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.