Pawar Family Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी त्यांची मुले अद्याप अनुभवी नाहीत, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्री करावे आणि शरद पवारांनी एनडीएमध्ये (NDA) सहभागी व्हावे,” असा प्रस्ताव आठवले यांनी मांडला आहे. बुधवारी २८ जानेवारी रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. आज बारामती येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगानंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी पवारांच्या वारशाबद्दल आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. सुनेत्रा पवारांकडे उपमुख्यमंत्रिपद – अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याबद्दल खंत व्यक्त करताना आठवले म्हणाले की, “दादांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार या सक्षम आहेत. पार्थ आणि जय पवार अजून राजकारणात तितकेसे अनुभवी नाहीत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यास अजितदादांचा वारसा योग्य पद्धतीने पुढे चालू शकेल.” शरद पवारांना एनडीएमध्ये येण्याचे आवाहन – रामदास आठवले यांनी या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची मनापासून इच्छा होती. आता दादांच्या निधनानंतर शरद पवारांनी आपले विचार बदलून एनडीएमध्ये सहभागी व्हावे. जर शरद पवार सोबत आले, तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल. राज्यात सुनेत्रा पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे असे समीकरण जुळून आल्यास ते राज्यासाठी हिताचे ठरेल,” असेही आठवले यांनी नमूद केले. बारामतीमध्ये अश्रूंचा महापूर – अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला असून, आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘एकच दादा, अजित दादा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि सर्वपक्षीय नेते विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांचा जनसागर लोटला होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देताना प्रत्येक कार्यकर्त्याचे डोळे पाणावले होते. हेही वाचा – Todays TOP 10 News: लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप ते राज्याच्या नवीन उपमुख्यमंत्र्याबाबत मोठी अपडेट, वाचा आजच्या टाॅप बातम्या