Todays TOP 10 News: अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी अंतिम निरोप महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ आणि जय पवार या त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला, तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीला साश्रू नयनांनी अंतिम निरोप दिला.बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अंत्यविधीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. महाराष्ट्र पोलिसांनी हवेत फैरी झाडून त्यांना अखेरची मानवंदना दिली. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बारामतीत समर्थकांचा अलोट सागर लोटला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांमुळे संपूर्ण परिसर भावूक झाला होता. Ajit Pawar सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी; अजित पवारांच्या निधनानंतर नेतृत्वाचा पेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पदावर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशी खळबळजनक मागणी राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. बारामती येथे अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर लगेचच झिरवाळ यांनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेय. दुसरीकडे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याने पक्षाच्या आगामी रणनीतीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. अंत्यविधीवेळी पार्थ आणि जय पवार यांनी मुख्य भूमिका बजावल्याने वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असतानाच, झिरवाळ यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस करून सत्तेच्या समीकरणात नवा ट्विस्ट आणलाय. अजित पवार विमान अपघात चौकशी सुरू; एएआयबी तपासणार ब्लॅकबॉक्स महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने राज्य हादरले असून, बारामती विमानतळावर झालेल्या या भीषण अपघाताच्या चौकशीची सूत्रे आता विमान अपघात तपास ब्युरोकडे सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती, ज्याची केंद्राने तातडीने दखल घेतली. तपास यंत्रणांनी विमानाचा ब्लॅकबॉक्स ताब्यात घेतला असून तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याचा सखोल शोध घेतला जातोय. केंद्र सरकारने हा तपास पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून, अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला जाईल. 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्या; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने वर्तमानपत्रांत दिलेल्या श्रद्धांजली जाहिरातींवरून राजकीय वाद पेटलाय. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र आक्षेप घेत भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप केला. केवळ पानभर जाहिराती देऊन श्रद्धांजली वाहणे पुरेसे नाही, असे राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर केलेले ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप अधिकृतपणे मागे घेणे, हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल, असा टोला त्यांनी लगावला. जिवंतपणी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांच्या निधनानंतर केवळ जाहिरातींतून गौरव करणे म्हणजे राजकीय सोय असल्याची टीका करत राऊतांनी भाजपला आरसा दाखवला. UGC च्या नवीन नियमांना स्थगिती; केंद्र सरकारला मसुदा सुधारण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देत केंद्र सरकारला मोठा दणका दिला. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या यांच्या खंडपीठाने या नियमांमधील तरतुदी अस्पष्ट असल्याचे सांगत त्यांच्या गैरवापराची भीती व्यक्त केली. जातीविहीन समाजाकडे जाण्याऐवजी आपण उलट्या दिशेने जात आहोत का, असा परखड सवाल न्यायालयाने यावेळी उपस्थित केला. आरक्षित समुदायांसाठीची तक्रार निवारण प्रणाली प्रभावीपणे लागू राहणे आवश्यक असल्याचे सांगत न्यायालयाने केंद्राला नवीन मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या नियमांविरोधात देशभरात संतापाची लाट असून दिल्ली आणि लखनऊ विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली आहेत. Sadhvi Prem Baisa Death साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद मृत्यू; मृत्यूनंतरच्या इन्स्टाग्राम पोस्टने खळबळ राजस्थानमधील प्रसिद्ध कथावाचक साध्वी प्रेम बाईसा यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने जोधपूरमध्ये मोठी खळबळ उडालीय. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना आश्रमातून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, निधनाच्या चार तासानंतर त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक धक्कादायक पोस्ट करण्यात आली, ज्यात ‘हा माझा शेवटचा दिवस’ असल्याचे नमूद करत न्यायाची मागणी केलीय. यामुळे आत्महत्येचा संशय बळावला असून, चुकीचे इंजेक्शन दिल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. खासदार हनुमान बेनीवाल यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूमागचे नेमके रहस्य उलगडेल. भारताचा विकासदर 7.2 टक्के राहण्याचा अंदाज; तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर भर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या २०२५-२६ च्या आर्थिक सर्वेक्षणात भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षात देशाचा वास्तविक जीडीपी विकासदर ६.८ ते ७.२ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून, भारताचा संभाव्य वृद्धीदर ७ टक्क्यांच्या आसपास कायम राहील. देशांतर्गत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील सुधारणांमुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे सर्वेक्षणात म्हटलेय. विशेष म्हणजे, बँकिंग क्षेत्रातील एनपीए २.२ टक्क्यांच्या नीचांकी पातळीवर आला असून सेवा क्षेत्र अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार ठरतेय. उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या नाविन्यपूर्ण क्षेत्रांवर सरकारने लक्ष केंद्रित केलेय. याशिवाय, पायाभूत सुविधांवरील खर्च आणि राजकोषीय शिस्तीमुळे भारत जागतिक पुरवठा साखळीत एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचे या अहवालातून स्पष्ट होतेय. H-1B Visa। 15 हजार भारतीयांना फटका; टेक्सासमध्ये नवीन H-1B व्हिसावर बंदी अमेरिकेतील टेक्सास राज्याचे गव्हर्नर ग्रेग ॲबट यांनी पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत नवीन H-1B व्हिसा जारी करण्यावर तात्काळ बंदी घातलीय. पहिल्या टप्प्यात ही बंदी सरकारी कार्यालये आणि विद्यापीठांमध्ये लागू होणार असून, यामुळे सुमारे १५ हजार भारतीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आली आहे. टेक्सास वर्कफोर्स कमिशनने २७ मार्चपर्यंत सर्व व्हिसा धारकांचा सविस्तर डेटा मागवलाय. ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आणि व्हिसाचा कथित गैरवापर रोखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत असून, सध्या खाजगी कंपन्यांना यातून सवलत असली तरी भविष्यातील नूतनीकरणाबाबत साशंकता आहे. या निर्णयाला २० राज्यांनी फेडरल कोर्टात आव्हान दिले असून भारतीय आयटी क्षेत्रावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. किंग खानच्या साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने; सुरक्षा तपासणीवेळी शाहरुख खानने काढला चष्मा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला, ज्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विमानतळावर सुरक्षा तपासणी सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाने शाहरुखला ओळख पटवण्यासाठी चश्मा काढण्याची विनंती केली. कोणत्याही बडेजावाशिवाय शाहरुखने शांतपणे चश्मा काढला आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहकार्य केले. तपासणी संपल्यानंतर त्याने हसून सुरक्षा रक्षकाच्या खांद्यावर हात ठेवत दाद दिली. शाहरुखच्या या नम्र वागणुकीचे नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत असून, कायद्यासमोर सर्व नागरिक समान असल्याचे युजर्स म्हणत आहेत. शाहरुख लवकरच ‘किंग’ चित्रपटात आपली मुलगी सुहाना खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. टीम इंडियाची धाकधूक वाढली! वॉशिंग्टन सुंदर वर्ल्ड कप खेळणार की नाही? वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरच्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाचे टेन्शन वाढवलेय. सुंदरने बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला असली तरी, त्याच्या बरगड्यांच्या दुखापतीमुळे अद्याप वेदना होत आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान तो जखमी झाला होता. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघात एक दर्जेदार ऑफ-स्पिनर हवा असल्याने त्याच्या रिप्लेसमेंटबाबत घाई केली जात नाहीये. सुंदर अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे, परंतु पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी आशा बीसीसीआयला आहे.