Dilip Shanghvi: 1982 मध्ये 10 हजार रुपये गुंतवले अन् कंपनी सुरु केली, आता बनले भारतातील 8वे सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली – फोर्ब्सने 2023 या वर्षासाठी भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे (Forbes India rich list 2023). रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्योगपती गौतम अदानी आहेत. फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 92 अब्ज डाॅलर आहे, तर गौतम अदानी 68 अब्ज डाॅलरचे मालक आहेत.
एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक शिव नाडर फोर्ब्सच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक दिलीप सांघवी यांचे नावही टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट आहे. दिलीप सांघवी हे 19 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह भारतातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
दिलीप संघवी यांचा जन्म गुजरातमधील अमरेली या छोट्याशा शहरात 1955 मध्ये झाला. त्यांचे वडील कोलकाता येथे औषधाचे घाऊक विक्रेते होते. शालेय शिक्षणानंतर, सांघवी यांनी कोलकाता (तेव्हाच्या कलकत्ता) विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिलीप यांनीही वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. पण, काहीतरी मोठे करण्याचा त्यांचा मानस होता. इतरांनी बनवलेली औषधे आपण विकू शकतो तर आपण स्वतः औषधे का बनवू शकत नाही, असा विचार त्यांनी केला.
वयाच्या 27 व्या वर्षी कारखाना काढला –
दिलीप सांघवी यांनी गुजरातमधील वापी येथून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी स्वतःचा औषध कारखाना काढण्याचा निर्णय घेतला. 1982 मध्ये त्यांनी गुजरातमधील वापी येथे दहा हजार रुपये गुंतवून सन फार्मास्युटिकलचा पाया घातला. आज सन फार्मा कंपनी ही भारतातील सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि तिचे बाजार भांडवल 2.70 लाख कोटी रुपये आहे.
सुरुवातीला कंपनीने अनेक प्रकारची औषधे तयार करण्याऐवजी चांगल्या दर्जाच्या औषधांवर लक्ष केंद्रित केले. नशिबाने त्यांना साथ दिली आणि पहिल्याच वर्षी त्यांनी 7 लाखांचा व्यवसाय केला. कंपनीच्या मार्केटने चांगली कामगिरी केली. बरोबर 15 वर्षांनंतर, 1997 मध्ये, दिलीप यांनी तोट्यात चालणारी अमेरिकन कंपनी कार्को फार्मा विकत घेतली, जेणेकरून त्यांना अमेरिकन बाजारात पोहोचता येईल. 2007 मध्ये कंपनीने इस्रायली कंपनी तारो फार्मा देखील घेतली. आता ते भारतातील सर्वांत श्रीमंत दहा लोकांच्या यादीत सहभागी झाले आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
संघवी कार कलेक्शनमुळेही लोकप्रिय –
व्यवसाय आणि मानवतेच्या कल्याणाशी संबंधित त्यांच्या कार्यासोबतच, दिलीप संघवी त्यांच्या लक्झरी जीवनशैली आणि लक्झरी कार कलेक्शनसाठी देखील लोकप्रिय आहेत. दिलीप संघवी यांच्याकडे Rolls Royce Ghost, Bentley Mulsanne, BMW X5, Mercedes Benz G-Class आणि Audi A8 सारख्या महागड्या गाड्या आहेत.




