पिंपरी | उन्हाळ्यात गवताला लागणारी आग टाळता येऊ शकते

सांगवी, (वार्ताहर) – पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव ते औंध व रक्षक सोसायटी, जगताप डेअरी यामधील मिलिटरीच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेमध्ये दरवर्षी वाळलेल्या गवताला आग लागते. ही आग लागू नये, म्हणून संरक्षण विभागाने पावसाळा संपताच हे गवत जनावरांसाठी काढून घेऊन जाण्याचे दूध उत्पादकांना आवाहन करावे किंवा जाळपट्टा काढल्यास संभाव्य आग टाळता येऊ शकते, असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.
गेल्या तीन चार दिवसांपूर्वी पिंपळे गुरवमधील मिलिटरीच्या हद्दीतील गवताला मोठी आग लागली होती. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. हा परिसर मोठा आहे. पावसाळ्यात या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात गवत उगवते. परिणामी आजूबाजूच्या रहिवाशांना डासांचा सामना करावा लागतो. मात्र, हे टाळता येऊ शकते, असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात.
पावसाळा संपत आल्यावर परिसरातील दूध उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना गवत कापून नेण्याचे आवाहन केल्यास ते जनावरांसाठी गवत कापून नेऊ शकतात. त्यामुळे आपोआप परिसर गवतमुक्त होईल. परिणामी आग लागण्याच्या घटनेला दरवर्षी सामोरे जावे लागणार नाही.
दुसरा पर्याय म्हणजे गवत कापल्यानंतर 25 किंवा 30 मीटर अंतरावर जाळपट्टा काढावा, जेणेकरून उर्वरित छोट्या मोठ्या गवताला आग लागली तरी ती भडकत नाही व नियंत्रण आणता येते. आगीच्या घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन गट स्थापन करून दरवर्षी अशा घटना होण्याअगोदरच काळजी घेतली जाईल.
याशिवाय गवत चार्याच्या माध्यमातून मिळणार्या निधीतून आपत्ती व्यवस्थापनाचा खर्च मिलिटरी प्रशासनास उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय या परिसरामध्ये दरवर्षी जे काय झाडे लावली जातात ती देखील या आगीमुळे खाक होतात. ती देखील चांगल्या पद्धतीने वाचविली जातील.
उन्हाळ्यामध्ये साधारणपणे फेब्रुवारी, मार्चच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आग लागते. याबाबत मिलिटरी प्रशासनाच्या वतीने या घटना टाळण्यासाठी जे गवत वाढेल ते साधारणपणे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये शेतकर्यांना आवाहन करून गवत कापून नेण्यासंदर्भात परवानगी द्यावी. याशिवाय गवत कापल्यानंतर 25 किंवा 30 मीटर अंतरावर जाळपट्टा काढावा ज्यामुळे उर्वरित छोट्या मोठ्या गवताला आग लागली तरी ती भडकत नाही व नियंत्रण आणता येते. – डॉ. चंद्रशेखर पवार, पर्यावरणतज्ज्ञ.





