कुसगाव बुद्रुक – लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निॉलॉजीमधून (एसआयटी) संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला सुमित कोल्हे या विद्यार्थ्याची परदेशी कंपनीने “प्लेसमेंट’मधून निवड केली आहे. या विद्यार्थ्याला हॉंगकॉंगच्या मॅझेकेअर कंपनीने वार्षिक 28.38 लाखांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.
सुमित कोल्हे हा संगमनेर तालुक्यातील असून, तो मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. सुमीत लोणावळ्यातील “एसआयटी’चा विद्यार्थी, त्याचे वडील सेवानिवृत्त सैनिक असून ते सध्या पोलीस हवालदार म्हणून देहूरोड येथे कार्यरत आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत सुमित नुकताच संगणक अभियांत्रिकीमधून पदवी घेतली.
“एसआयटी’च्या प्लेसमेंटमधून सुमितला मॅझेकेअर या हॉंगकॉंग कंपनीमध्ये 25000 डॉलर्स प्रतिमहा म्हणजेच वार्षिक 28 लाख 38 हजार रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. येत्या 27 सप्टेंबरपासून सुमित हॉंगकॉंगमधील मॅझेकेअर कंपनीत रुजू होणार आहे. सिंहगड संकुलचे लोणावळा संचालक, प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड यांनी फोनवरून त्याचे व कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय प्लेसमेंट सेलचे डॉ. पितांबरे, “एसआयटी’मधील प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. निशांत पाचपोर, विभाग प्रमुख डॉ. सचिन बाबर यांनी सुमितचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी ही प्लेसमेंट केवळ एसआयटीच्याच नव्हे, तर अभियांत्रिकीमधील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.