Sukhdev Singh Dhindsa : माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांचे निधन

मोहाली : अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग धिंडसा यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांना तीन दिवसांपूर्वी मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी क्रीडा मंत्रीपद भूषवले होते. मार्च २०२४ मध्ये त्यांनी त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल (युनायटेड) सुखबीर सिंह बादल यांच्या नेतृत्वाखालील पक्षात विलीन केला होता. २०२० मध्ये धिंडसा आणि त्यांच्या मुलाला पक्षविरोधी कारवायांसाठी अकाली दलातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती.
अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. सरदार सुखदेव सिंग जी धिंडसा साहेबांच्या निधनाने मन खूप दुःखी आहे. धिंडसा साहेबांनी शिरोमणी अकाली दलात दीर्घकाळ पंजाब आणि देशाची सेवा केली, जी नेहमीच लक्षात राहील. मी वैयक्तिकरित्या आणि शिरोमणी अकाली दलाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला त्यांच्या कमल चरणी स्थान द्यावे आणि कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.
शिरोमणी अकाली दलाच्या विस्तारात धिंडसा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शीख राजकारणावर त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जात होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्री अकाल तख्तने त्यांना धार्मिक शिक्षा दिली तेव्हा त्यांची चर्चा झाली होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यासह अनेक नेत्यांना तनखैया घोषित करण्यात आले होते. त्यांनी म्हटले होते की अकाल तख्तचा आदेश हा देवाचा आदेश आहे. त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सेवा केली होती.





