Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरला मोठा धक्का ! सुप्रीम कोर्टाने ‘ती’ याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कथित ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याला एका फौजदारी खटल्यातील दोषसिद्धीला स्थगिती देण्याच्या मागणीवर दिलासा देण्यास नकार दिला.

Sukesh Chandrasekhar : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कथित ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याला एका फौजदारी खटल्यातील दोषसिद्धीला स्थगिती देण्याच्या मागणीवर दिलासा देण्यास नकार दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी त्याची याचिका न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी आली होती. मात्र, खंडपीठाने याचिका ऐकून घेण्यास नकार दिला.
२०१७ मधील भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे सोंग घेऊन विशेष न्यायाधीशांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला (Sukesh Chandrasekhar) दिल्लीतील न्यायालयाने २० ऑगस्ट रोजी दोषी ठरवले होते. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी त्याला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या दोषसिद्धीला आणि शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी चंद्रशेखरने केली होती. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर रोजी त्याची याचिका फेटाळली. दोषसिद्धीविरोधातील अपील प्रलंबित असल्याने कनिष्ठ न्यायालयाने नोंदवलेल्या निष्कर्षांवर अपील न्यायालयातच विचार होणे योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. या निर्णयाला आव्हान देत चंद्रशेखरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, तेथेही त्याला दिलासा मिळाला नाही.
हवालदाराच्या मोबाइलवरून संपर्क
या प्रकरणातील घटना २८ एप्रिल २०१७ रोजी घडली. पोलिसांच्या कोठडीत असताना चंद्रशेखरने एका पोलीस हवालदाराचा मोबाईल वापरून तत्कालीन विशेष न्यायाधीश पूनम चौधरी यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप आहे. त्याने प्रथम सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या खासगी सचिवाचे आणि नंतर त्या न्यायाधीशांचे सोंग घेतले होते.
सरकारी अधिकाऱ्याचे सोंग घेणे आणि धमकावणे यासाठी प्रत्येकी दोन वर्षे, तर निनावी संदेशाद्वारे गुन्हेगारी धमकी दिल्याबद्दल चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षा सलग भोगण्याचे आदेश देण्यात आल्याने एकूण कारावास आठ वर्षांचा (Sukesh Chandrasekhar) झाला.






