Sujay Vikhe Patil : ‘दैनिक प्रभात’च्या वृत्ताचा धडाका! सुजय विखे पाटलांचा लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना भरसभेत इशारा
Sujay Vikhe Patil : पदाचा उपयोग जनतेच्या कामासाठी करण्याचा विखे पाटील यांचा सल्ला

नेवासे: सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी आहे. अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असलात तरी लोकहितासाठी आता प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर माझे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही मी स्वतः तुमच्यासोबत आंदोलनात उतरेल, असा थेट आणि स्पष्ट इशारा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
नेवासे येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांच्यासमोरच अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची चांगलीच झाडाझडती घेत सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्याचा कडक सल्ला दिला.
नेवासे तालुक्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये सध्या ‘दम करी काम’ (अडवणूक व भ्रष्टाचार) प्रशासनराज सुरू असल्याची जनतेची खदखद ‘दैनिक प्रभात’ने रविवारच्या अंकात सविस्तर व निर्भीडपणे मांडली होती. याच वृत्ताचा धागा पकडत डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. ‘दैनिक प्रभात’च्या या परखड आणि वस्तुनिष्ठ वृत्ताचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्त स्वागत केले आहे. (Sujay Vikhe Patil)
आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी करून गोरगरिबांना त्यांचे हक्क देणार नसाल तर तुमच्या पदाला काय किंमत, असा रोखठोक सवाल डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांनी आपले मन आणि भावना साफ ठेवून काम करावे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागून त्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे, जेणेकरून नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी ताकीद दिली. (Sujay Vikhe Patil)
तसेच तालुका गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी महिलांवरील अत्याचार, बलात्कार आणि खून यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले. महसूल प्रशासनाने तालुक्यातील रस्ते व जमिनीचे वाद थेट घटनास्थळी जाऊन तातडीने निकाली काढावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Sujay Vikhe Patil)
याप्रसंगी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी सांगितले की, तालुक्यातील ११ मंडळांमध्ये आयोजित २२ महसूल शिबिरांच्या माध्यमातून सुमारे ७ हजार ५०० नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे. डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार आदी महसूल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी १३ शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. नेवासे शहरात प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर लवकरच सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गोरगरिबांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी नव्याने बांधलेल्या वैद्यकीय अधिकारी निवासस्थानी डॉक्टरांनी वास्तव्यास राहावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासे शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
‘दैनिक प्रभात’ने जनतेच्या मनातली खदखद निर्भीडपणे मांडून सरकारी कार्यालयात प्रत्येक कामात संबंधित अधिकारी आपला हात साफ केल्याशिवाय जनतेचे कामे करत नसल्याचे सविस्तर वृत्त प्रसारित केलेले असतांना हिच तक्रार सुद्धा अनेकांनी डॉ.सुजय विखे पाटील यांच्या समोर मांडल्यामुळे त्यांनी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केल्यामुळे दैनिक प्रभातच्या वृत्तांचे तालुक्यातील जनतेतून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा:
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर





