पुणे जिल्हा | लग्नासाठी जबरदस्ती केल्याने तरुणाची आत्महत्या

लोणी काळभोर, (वार्ताहर)- लग्न करण्यासाठी बळजबरी केल्याने एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना लोणी काळभोर परिसरातील साठेवस्ती येथे 21 मे 2023 रोजी घडली होती. सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर (वय. 20, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत विजया ज्ञानेश्वर काळभोर (वय 48, रा. साठेवस्ती, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार निकीता अशोक ससाणे, शुभम रवी ससाणे, स्वयंम रवी ससाणे, अशोक देवराम ससाणे आणि एक महिला अशा पाच जणांविरुद्ध (सर्व रा. तारासिटी समोर, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया काळभोर यांचा मुलगा सुदर्शन काळभोर याला लग्न करण्यासाठी बळजबरी केली.
लग्न न केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी वरील सर्वांनी दिली होती. यामुळे होत असलेल्या त्रासाला कंटाळून सुदर्शन याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. सुदर्शनच्या आईने गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती.





