पुणे जिल्हा | उरूळीत विवाहितेची आत्महत्या

उरुळी कांचन, (वार्ताहर)- उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात कारणावरून एका 37 वर्षीय विवाहित महिलेने घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. १६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
उषा संजय गायकवाड (वय 37, रा. शिंदवणे रोड, उरूळी कांचन, ता. हवेली), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती संजय तुकाराम गायकवाड यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दाते कॉम्प्लेक्स या ठिकाणी संजय गायकवाड हे त्याच्या पत्नीसह राहतात.
गुरुवारी दुपारी घरी कोणी नसताना राहत्या घरात उषा यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांचे पती संजय यांच्या निदर्शनास आले. संजय गायकवाड यांनी तात्काळ उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात उषा यांना दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





