Newasa : ऊसदराच्या वादावर उच्च न्यायालयात जनहित याचिका; ३ डिसेंबरला सुनावणी
Newasa : ऊसदर आणि ७०:३० सूत्रावरून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. ३ डिसेंबरला सुनावणी; अहिल्यानगरमध्ये प्रतिटन ३,४५० रुपयांचा दर निश्चित.

Newasa : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि साखर कारखान्यांच्या दरनिश्चितीतील पारदर्शकतेचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा विधिज्ञ अजित बबनराव काळे यांनी ही याचिका दाखल केली असून, ३ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र ऊस दर नियमन अधिनियम २०१३ नुसार राज्य सरकारने ऊस नियंत्रण मंडळ स्थापन करणे अपेक्षित आहे. या मंडळाकडे एफआरपीव्यतिरिक्त साखर आणि उपपदार्थांच्या उत्पन्नावर आधारित दर निश्चित करण्याची जबाबदारी आहे. कायद्यात साखर आणि बगॅस, मळी, प्रेसमड यांसारख्या उपपदार्थांच्या एकत्रित मूल्याच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे.
याचिकेत कारखान्यांकडून ऊसदर, तोडणी-वाहतूक खर्चातील कपात आणि साखर विक्रीतील पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना पहिली उचल ४,५०० रुपये आणि अंतिम दर ७०:३० सूत्रानुसार मिळावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्राने २०२६-२७ हंगामासाठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यावर एफआरपी ३,६५० रुपये प्रतिटन निश्चित केली आहे.





