Sugarcane grower: ऊस उत्पादकांचे आजपासून महामार्ग रोको
Sugarcane grower:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दिल्लीतील बोलणी फिस्कटली: महाराष्ट्र, कर्नाटकात आंदोलन
Sugarcane grower: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात सोमवारी (दि. १२) झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मंगळवार (दि. १३) पासून महाराष्ट्र, कर्नाटकात राष्ट्रीय महामार्ग रोकण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
साखरेचा किमान हमीभाव प्रतिकिलो ५० रुपये करणे, सी-हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करणे आणि लवकर हंगाम सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देणे, या तीन मागण्यांसाठी ही बैठक होती. बैठकीत केंद्र सरकारने समिती नेमून महिनाभरात प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, तातडीने निर्णय न झाल्याने शेतकरी प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
तीन तास चाललेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून दरवर्षी रास्त आणि किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ केली जात असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. त्यावर शेट्टी यांनी खते, कीटकनाशके, मजुरी, तोडणी-वाहतूक आणि साखर प्रक्रिया खर्चात झालेल्या वाढीचाही विचार करण्याची मागणी केली.
एफआरपी वाढवल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. गेल्या आठ वर्षांपासून साखरेचा किमान विक्रीभाव न वाढल्याने कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्याचा मुद्दाही शेट्टी यांनी मांडला.
बोलणी फिसकटल्याने उद्या, मंगळवार सकाळी ११ वाजल्यापासून कोगनोळी टोलनाका, कराड, सातारा आणि इंदापूरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखण्याचे नियोजन आहे. परभणी, नांदेडमध्येही आंदोलन होणार असून, कर्नाटकात हुबळी, गदग आणि हत्तरकी परिसरात महामार्ग रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनादरम्यान साखरेची वाहतूकही रोखण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.





