पुणे जिल्हा | कर्मयोगी, नीरा भीमाकडून ऊस बिले वर्ग

इंदापूर, (प्रतिनिधी) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना महात्मा फुलेनगर (बिजवडी) व नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर, या दोन्ही कारखान्यांची गळीत हंगाम 2023-24 मधील सर्व ऊस बिले शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहेत, अशी माहिती कर्मयोगी व नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.
राजवर्धन पाटील म्हणाले की, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही कारखाने शेतकरी हितासाठी कटिबद्ध आहे. या दोन्ही कारखान्यांकडून गाळप झालेल्या सर्व उसाची प्रति टन 2700 रुपये प्रमाणे सर्व रक्कम व ऊस तोडणी वाहतुकीची सर्व बिले अदा करण्यात आली आहेत.
त्यामुळे शेतकरी वर्ग व वाहतूकदारांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी काळ दोन्ही कारखान्यासाठी भरभराटीचा राहणार आहे. या दोन्ही कारखान्यांचा अडचणीचा काळ संपला असून आता कारखाने पूर्व पदावर येत आहेत, त्यामुळे कारखाने गतवैभव प्राप्त करतील, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशातील साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहकार चळवळ मजबूत होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यानेतृत्वाखाली राज्य सरकारही साखर उद्योग व शेतकरी हितासाठी सहका-याची भूमिका घेत आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी देशातील साखर उद्योगापुढील प्रश्न केंद्र सरकारपुढे मांडून ते सोडवण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकरी हिताचे अनेक निर्णय होत आहेत.





