भारतातील साखर उत्पादनात घट

नवी दिल्ली – ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये भारतातील साखर कारखान्याचे उत्पादन 16 टक्क्यांनी कमी होऊन 95.40 लाख टन झाले आहे. भारतातील साखर कारखान्याचे उत्पादन ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते. पहिल्या काही महिन्यांमध्ये साखर उत्पादन पुरेसा वेग घेत नाही. महाराष्ट्रातील साखर उत्पादन या तीन महिन्यात बरेच कमी झाल्यामुळे एकूण साखर उत्पादनावर नकारात्मक परिणाम झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत साखर कारखान्यांनी 113 लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. या आकडेवारीमध्ये इथेनॉलसाठी वळविलेल्या साखरेला विचारात घेतले जात नसल्याचे साखर कारखानदारांच्या संघटनेने या सदर्भात सांगितले आहे.
इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने ही आकडेवारी जारी करताना सांगितले की, विविध राज्यांमध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये ज्या प्रमाणात उसाचा पुरवठा होणे अपेक्षित होते त्या प्रमाणात ऊसाचा पुरवठा न झाल्यामुळे साखर कारखान्याच्या उत्पादकतेवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेषतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना त्यांच्या क्षमतेइतका ऊस मिळाला नसल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत 512 साखर कारखान्यात साखरेचे उत्पादन सुरु झाले होते. यावर्षी आतापर्यंत 493 साखर कारखान्यात साखरेचे उत्पादन सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठा साखर उत्पादन करणारे राज्य आहे. या राज्यात या तीन महिन्यात साखरेचे उत्पादन कमी होऊन 32.80 लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत उत्तर प्रदेशात 34.35 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
महाराष्ट्र हे साखर उत्पादन करणारे सर्वात मोठे दुसरे राज्य आहे. या राज्यात या तिमाहीत साखर उत्पादन कमी होऊन केवळ 30 लाख टन झाले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत महाराष्ट्रात 38.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.





