Sudin Dhavalikar : सुदिन ढवळीकर यांची होणार उचलबांगडी; जीत आरोलकरांना मंत्रिपदाची संधी

पणजी : गोव्यात सुदिन ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून उचलबांगडी करून जीत आरोलकर यांना मंत्रिपद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत याविषयी केंद्रीय गृहमंत्री तसेच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अमित शाह यांच्याकडून हिरवा कंदील घेतला असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शनिवारी प्रियोळमधील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला युतीची गरज नसल्याचे स्पष्टच सांगितले होते. प्रियोळ आणि मांद्रेच्या बाबतीत काडीचीही तडजोड केली जाणार नाही. मान्य नाही तर मगोपने (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) चालते व्हावे, असा सडेतोड इशाराही सावंत यांनी दिला होता. तेव्हाच सुदिन यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे मुख्यमंत्र्यांनी निश्चित केल्याचे स्पष्ट झाले होते.
जीत आरोलकर मगोपचे आमदार असले तरी भाजपाच्या अत्यंत निकट आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर मगोपने युती तोडली तरी, जीत मगो विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन करू शकतात. ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापनादिन आहे. हा मुहूर्त साधून जीत यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी जीत वेगळी चूल मांडून मगोप विधिमंडळ गट भाजपात विलीन करतील, असा अंदाज आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत दिल्लीहून परतल्यानंतर या घडामोडींना वेग येईल.
दिगंबर कामत पुन्हा मंत्रीमंडळात?
मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. आलेक्स सिक्वेराही यांनाही डच्चू देण्यात येवू शकतो. त्या जागी दिगंबर कामत यांना मंत्रिमंडळात घेतले जाऊ शकते. कामत यांचा समावेश झाल्यास त्यांच्याकडे वीज खाते देण्याची सर्वाधिक शक्यता आहे. यापुर्वी पर्रीकर सरकारमध्ये दिगंबर कामत यांनी वीज खाते बऱ्यापैकी हाताळले होते. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात वीज खात्यासाठी सर्वाधिक ४१३१.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.





