Rumors of a ghost at school : अचानक काहीतरी भयानक दृश्य दिसलं अन्… ; भूत दिसल्याच्या अफवेमुळे या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Rumors of a ghost at school : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनुदानित अदिवासी शाळेत भूत दिसल्याचा दावा इयत्ता तिसरी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनींनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे तालुक्यात भूत दिसल्याच्या अफवेची जोरदार चर्चा होत आहे. या अफवेमुळे तब्बल ४०० ते ५०० विद्यार्थी शाळा सोडून गेले. ही अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी यांनी थेट शाळेला भेट दिली. नेमकं काय घडलं? या आश्रमशाळेत?
नेमकं काय घडलं?
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील इयत्ता तिसरी आणि इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनाना अचानक काहीतरी भयानक दृश्य दिसले. यानंतर दोघींनीही जोरजोरात किंचाळत घाबरणं सुरू केलं. काही क्षणातच एकला भोवळही आली. तिच्या प्रतिक्रियेने अन्य विद्यार्थीचींही घाबरगुंडी उडाली. भूत असल्याची चर्चा शाळेभर पसरली. यामुळे अनेक विद्यार्थी घाबरले, रडू लागले. मात्र, खरंच नेमकं काय घडलं होतं, याची माहिती मिळू शकलेली नाही.
मुलांना थेट शाळेतून घरी धाव घेत घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर मुलांच्या पालकांनीही शाळेकडे धाव घेतली. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला, पण त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी ऐकून न घेता शाळा रिकामी केली. पालक आपल्या मुलांना घेऊन गावाकडे निघून गेले आहेत, अशी माहिती मिळत आहे.
अत्यंत दयनीय अवस्था
एकीकडे या अफवेची जोरदार चर्चा सुरू असली तरी आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये असलेले भीषण वास्तव आणि अनेक सुविधांचा अभाव चव्हाट्यावर आला आहे. सरकारकडून निधीची तरतूद करूनही अनेक आश्रम शाळांमध्ये अत्यंत दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे.





