Saba Pataudi : अचानक दिसेनासं झालं, रस्त्यातच बेशुद्ध पडली; 27 व्या वर्षी ब्रेन ट्यूमरचं निदान, सैफ अली खानच्या बहिणीचा धक्कादायक खुलासा
Saba Pataudi : या कठीण काळात तिला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, याबद्दल तिने मनमोकळेपणे भाष्य केले.

Saba Pataudi : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची बहीण सबा पटौदी ही नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगाचा खुलासा केला आहे.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सबाला ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. या अनपेक्षित धक्क्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. या कठीण काळात तिला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, याबद्दल तिने मनमोकळेपणे भाष्य केले.
अभिनेत्री सोहा अली खानच्या ‘ऑल अबाऊट हर’ या पॉडकास्टमध्ये सबा सहभागी झाली होती. यावेळी तिने आजाराचे निदान होण्यापूर्वीचा प्रसंग, अचानक बिघडलेली प्रकृती आणि त्यानंतरच्या उपचारांबाबतच्या आठवणी सांगितल्या.
अचानक बिघडली प्रकृती; रस्त्यावर आली बेशुद्ध पडण्याची वेळ
आपल्या आजाराची सुरुवात कशी झाली, याबद्दल सांगताना सबा म्हणाली की, सुरुवातीला तिला कोणतीही ठळक लक्षणे जाणवली नव्हती. एके दिवशी ती बाहेर गेली असताना तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले. सुरुवातीला पोटाचा त्रास झाला असावा किंवा खाण्यापिण्यात काहीतरी चुकीचे झाले असावे, असे तिला वाटले.
तिने आपल्या मैत्रिणीला तब्येत ठीक नसल्याचे सांगितले आणि घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तिथून निघण्याच्या तयारीत असतानाच तिला अचानक सर्व काही अंधुक दिसू लागले आणि ती बेशुद्ध झाली.
२० ते २५ मिनिटांनी आली शुद्ध
त्या प्रसंगाची आठवण सांगताना सबाने म्हटले की, जेव्हा तिला शुद्ध आली, तेव्हा ती इमारतीच्या बाहेर रस्त्यावर पडलेली होती. त्यानंतरही तिने मैत्रिणीला घरी परतण्याची विनंती केली, कारण तिला अजिबात बरे वाटत नव्हते.
तिला पूर्णपणे शुद्धीवर येण्यासाठी सुमारे २० ते २५ मिनिटे लागली. तरीही तिच्या मनात गोंधळ होता आणि ती पूर्णपणे सामान्य स्थितीत आली नव्हती. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर तिची एमआरआय तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिच्या मेंदूमध्ये गाठ असल्याचे निदान झाले.
एमआरआयनंतर सहा महिन्यांनी झाली शस्त्रक्रिया
सबा पटौदीने सांगितले की, एमआरआय तपासणीनंतर सुमारे सहा महिन्यांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिला ‘पिलोसायटिक ॲस्ट्रोसायटोमा’ (Pilocytic Astrocytoma) या प्रकारच्या ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. हा सामान्यतः कमी दर्जाचा, हळूहळू वाढणारा मेंदूतील गाठ (ट्यूमर) असतो.
‘अचानक विनाकारण रडू लागायचे’
या कठीण काळातील मानसिक संघर्षाबद्दल बोलताना सबा म्हणाली की, अशा प्रसंगानंतर आयुष्यातील काहीच गोष्टी पूर्वीसारख्या वाटत नाहीत. ती अचानक विनाकारण रडू लागायची. इतक्या कमी वयात अशा गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल, याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती.
आपल्यासोबत जे घडले, ते इतर कोणाच्याही वाट्याला येऊ नये, अशी भावनाही तिने व्यक्त केली. सबा पटौदीने सांगितलेल्या या अनुभवातून अचानक समोर आलेल्या गंभीर आजाराचा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर आणि मानसिक स्थितीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, हे अधोरेखित होते.
Sonam Wangchuk : दिल्लीतील आंदोलनात सोनम वांगचुक सहभागी होणार नाहीत; व्हिडिओ शेअर करत सांगितले कारण





