पीएमपीच्या खासगी बसचालकांचा अचानक संप, प्रवाशांना फटका

पुणे – “महागाईच्या काळात चालकांकडून तटपुंज्या मानधनावर काम करून घेतले जात आहे. वारंवार पगारवाढीची मागणी करूनही ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जाते. आता सहनशक्ती संपली,’ असे सांगत पीएमपीच्या ई-बसवर कार्यरत असलेल्या ट्रॅव्हल टाइम कंपनीच्या चालकांनी शुक्रवारी (दि. 25) अचानक संप पुकारला. त्यामुळे पीएमपी बससेवा ठप्प होऊन प्रवाशांचे हाल झाले.
पीएमपीकडे ट्रॅव्हल टाइम कंपनीकडील 200 चालक असून, त्यांनी शुक्रवारी सकाळपासून संप पुकारल्यामुळे अनेक फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे कर्वेरस्त्यासह अन्य मार्गावर प्रवाशांना बसची वाट पाहत ताटकळत उभे रहावे लागले. यावेळी प्रशासनाकडून चालकांचे नियोजन करून मार्गावर बस सोडल्या. शुक्रवारी मार्गावर 1,635 बस उतरवण्यात आल्या. पीएमपी अध्यक्षांनी नुकत्याच जास्तीत जास्त बस मार्गावर उतरवल्या होत्या. सुमारे 1,700 ते 1,750 बस दररोज मार्गावर असतात. परंतु, शुक्रवारी मार्गावरील बसची संख्या काही प्रमाणात कमी झाली.
दरम्यान, संप सुरू असल्याने बसस्टॉपवर मोठी गर्दी झाली होती. त्यात कर्वे रस्त्यावर गरवारे कॉलेजसमोर आणि अन्य दोन ठिकाणी बस ब्रेकडाऊन झाल्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी आणखी वाढली.
कर्मचाऱ्यांची मागणी काय?
“महागाईच्या काळात किमान 750 ते 900 रुपयांपर्यंत रोज मिळायला हवा. मात्र, ठेकेदार आम्हाला फक्त 530 रुपयेच देतात. इतक्या कमी पगारात आम्ही घर कसे चालवणार? त्यामुळे पीएमपी प्रशासनाने यात मध्यस्थी करून योग्य तो निर्णय घ्यावा,’ अशी मागणी चालकांकडून करण्यात आले.
प्रश्न मंत्र्यांच्या दालनात
“संप पुकारल्यानंतर काही चालकांनी भेट घेऊन पगारवाढीच्या समस्या सांगितले. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवू. तत्पूर्वी चालकांनी संप मागे घेऊन पुणेकरांना सेवा पुन्हा सुरू करावी, अशी विनंतीही केली. दरम्यान, चालकांच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना आज निवेदन देण्यात आले,’ असे क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती माजी अध्यक्ष विजय डाकले यांनी सांगितले.
“ठेकेदारांकडील चालकांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला पूर्वकल्पना न देता संप पुकारला. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करत पीएमपीच्या कर्मचारी, वाहक व चालकांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय टाळण्याचे प्रयत्न करण्यात आले. नियमित मार्गस्थ होणाऱ्या बसेसचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.” – सतीश गाटे, जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल





