पुणे | रिक्षाचालकाचा असाही प्रामाणिकपणा

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे बिहारमधील व्यक्तीला लॅपटॉपसह अन्य कागदपत्रे सुखरूप मिळाली. रिक्षाचालकाने प्रवाशाची विसरलेली बॅग मुंढवा पोलीस ठाण्यात आणून दिली. रिक्षाचालकाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे पोलिसांनी त्यांचा सत्कार केला.
नवनीत लाल गुगळे (रा. नेवासा, जि. नगर) असे रिक्षाचालकाचे नाव आहे. ते खराडी आयटी पार्क परिसरातून प्रवाशाला सोडण्यासाठी हडपसरकडे निघाले होते. मुंढवा पुलावर त्यांना रिक्षात बॅग सापडली. त्यांनी बॅग न उघडता मुंढवा पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पाेलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी बॅगेची पाहणी केली.
तेव्हा बॅगेत महागडा लॅपटाॅप व विविध कागदपत्रे मिळाली. कागदपत्रांवरून सहायक पोलीस निरीक्षक रमेश उगले यांनी माहिती काढली. वाहनाची कागदपत्रे ममतोष प्रकाश (रा. पाटणा, बिहार) यांच्या नावावर असल्याचे समजले. पोलिसांनी प्रकाश यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांची मुलगी माही हडपसर भागातील अॅमेनोरा सिटीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संपर्क काढून तिच्याकडे सोपवली.





