Satara News : पावसाच्या पाण्याने मारले, कोको फार्मिंगने तारले; भात शेती वाचविण्यासाठी प्रयोग

सातारा : अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यात चांगलाच धुडगूस घातला. अतीपावसामुळे अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी आडून राहिल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे पाणी शेतातच राहिल्याने रोपेे अक्षरशः कुजून गेली. पेरायचं काय असा प्रश्न शेतकर्यांपुढे आ वासुन उभा असताना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळ सावली आणि ग्रामस्थ मंडळ सावली यांच्या संयुक्त विद्यमाने कोको फार्मिंगचा जिल्ह्यातील पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला. अवघ्या चार दिवसांत बिज अंकुर दृष्टिक्षेपात आल्याने शेतकर्यांवरील मोठे संकट दुर झाले.
अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांना ओल्या दुष्काळात टाकले. याचाच फटका परळी खोर्यातील सावली या गावातील शेतकर्यांनाही बसला. भाताचे प्रमुख उत्पादन घेणार्या या गावातील भाताची रोपे पावसाच्या पाण्यात कुजून गेली. शेतात पाणी साठून राहिल्याने येथे नवीन रोपेही तयार करणे शेतकर्यांसाठी अवघड होउन बसले.
सार्वजनिक क्रिडा गणेशोत्सव मंडळ सावली आणि ग्रामस्थ मंडळ सावली यांच्या संयुक्त विद्यमाने कोको फार्मिंगचा प्रयोग करून शेतकर्यांना विश्वास निर्माण करून दिला. गावातील सर्व शेतकरी आणि मंडळाचे कार्यकर्ते यांनी मिळून हा उपक्रम राबवला, जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे, ओल्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्यांची सर्व भात लावणीची रोपे पाण्याखाली गेली.
रोपे नाहीत तर भात लावणी करायची कशी याच विवंचनेत असलेल्या गावातील सर्व शेतकर्यांसाठी कोकोपिट या पर्यायी माध्यमातून रोप लावणीची माहिती व प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गावातील सर्व शेतकर्यांना मंडळाच्या सहकार्याने कोकोपीट आणि प्लास्टिक कागद उपलब्ध करून देत भात शेती वाचविण्यासाठी नव्या मार्गाचा अवलंब करण्यात आला. या उपक्रमास मेढ्याचे उपकृषि अधिकारी प्रसाद फडतरे तसेच सोनगावचे सहाय्यक कृषी अधिकारी भानुदास चोरगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
1. कोकोपीट म्हणजे काय?
नारळाच्या सालीपासून बनवलेला एक नैसर्गिक फायबर म्हणजे कोकोपीट. नारळाच्या सालावर प्रक्रिया करून कोकोपीट तयार केले जाते. मातीसाठी पर्याय म्हणून कोकोपीटचा वापर केला जातो. मातीपेक्षा हलके असल्याने कोकोपीट पाणी धरून ठेवते आणि हवेचा चांगला प्रवाह जात असल्याने उगवण क्षमता वाढते. कोकोपीट शंभर टक्के नैसर्गिक आणि सेंद्रिय असल्याने वनस्पतींसाठी सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल ठरते.
2. 1 हजार 500 किलो कोकोपीट
परळी खोर्यातील सावली या भागात मोठ्या प्रमाणावर भात पिक घेण्यात येते. पावसाने भात लावणीची रोपे पाण्याखाली गेल्याने मोठे संकट ओढवले. गावातील पन्नासहून अधिक शेतकर्यांना याचा फटका बसला. यातून मार्ग काढण्यासाठी काको फार्मिंगचा पर्याय अवलंबण्यात आला. यासाठी सुमारे 1 हजार 500 किलो कोकोपीटचा वापर करण्यात आला.
3. यासाठी केला प्रयोग
नारळाच्या सालीपासुन बनवलेल्या कोकोपीटमध्ये योग्य प्रमाणात शेतातील माती टाकण्यात आली. शेतात प्लास्टिकच्या कागदावर हे कोकोपीट टाकून भात रोपे तयार करण्यासाठी त्यावर भिजवलेले तांदूळ टाकण्यात आले. पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणार्या कोकोपीट प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याने बिजे अंकुरण्यासाठी आवश्यक आर्द्रता तयार झाली. अवघ्या चार दिवसांतच कोकोपीटमध्ये ही रोपे अंकुरण्यास सुरूवातही झाली.
यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने भात रोपे तयार करण्यासाठी शेतकर्यांना संधी मिळाली नाही. जून महिना उजाडला तरी पावसाचे पाणी शेतांमध्ये राहिल्याने भात रोपे उगवायची कुठे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला. यावर उपाय म्हणून कोको फार्मिंगचा प्रयोग करण्यात आला. ग्रामसथांनी एकत्र येवून केलेला जिल्ह्यातील हा पहिला प्रयोग ठरला आहे.
– प्रसाद फडतरे, उप कृषी अधिकारी, मेढा





