पुणे जिल्हा | पुरंदरमध्ये प्रथमच केळीची यशस्वी शेती

बेलसर, {निखील जगताप} – पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणुन ओळखला जातो. परंतु आता ही ओळख पुसली जात असताना दिसत आहे. तालुक्यात पिढ्यांनपिढ्या पारंपरिक पिके घेतली जातात; परंतू आता या पिकांकडे दुर्लक्ष करून या पिकांपेक्षा अधिक नफा मिळवून देणारे केळी पिकाची फळबाग प्रथमच यशस्वी रीत्या घेऊन पंचक्रोशितील तरुण बळीराजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण सम्राट विकास जगताप यांनी दिले. कोथळे येथे तालुक्यात प्रथमच केळी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला व पुरंदर तालुक्यातील केळी थेट दुबई आणि इराक या देशांमध्ये निर्यात देखील केली आहे.
एका एकरात 1450 रोपांची लागवड
एका एकरामध्ये केळीची साधारणत: 1450 रोपे लागवड केली जातात. तर जगताप यांनी दीड एकर क्षेत्रात 2 हजार रोपांची लागवड केली. राईज अँड शाईन या कंपनी मधुन जी-9 (ग्रँड-9) या वाणाच्या रोपांची खरेदी करुन लागवड केली. या केळीचा वाण हा अधिक उत्पन्न, अधिक मागणी व गुणवत्ता पूर्ण उत्पादन यासाठी प्रसिद्ध असल्याने या वाणाची निवड केल्याचे शेतकरी सांगतात.
6 बाय 5 फुटांवर घेतले खड्डे
कोरडे वातावरण तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन पिकासाठी अवश्यक असल्याने कोथळे हा भाग केळी लागवडीस अत्यंत योग्य आहे. लागवड करताना 6 बाय 5 फुटांवर खड्डे घेवून त्यामध्ये केळीची रोपे लागवड केली. त्यामध्ये एकरी बेसल डोस 10:26:26 च्या 10 बॅग, कंपोस्ट खत 50 बॅग, महाधन बेनसेल्ल्फ 25 किलो, मायकोरायझा – 12 किलो, मायक्रो न्यूट्रिअंट- 20 किलो, निंबोळी पेंड – 200 किलो व ह्युमिक सिड 20 किलोचा वापर केला आहे. केळी हे खादाड पीक असल्याने खतावर जास्त भर दिला आहे.
ड्रिप इरिगेशनने पाण्याचे व्यवस्थापन
केळी या पिकाला पाणी जास्त लागत नाही, पाण्याचे योग्य नियोजन आणि वापसा आल्यावर पाणी देणे ही योग्य पद्धत असल्याचे शेतकरी सांगतात. जगताप यांनी ड्रिप इरिगेशन करुन पाणी व्यवस्थापन केले आहे. त्यांच्या स्वतःच्या 2 विहिरी 4 बोअरवेल व पुरंदर उपसा योजनेचे पाणी उपलब्ध होत असल्याने पाणी देणे सोपे झाले.
बेसल डोसवर जास्त भर
केळी या पिकाला खत व अन्नद्रव्य जास्त प्रमाणात लागते.त्यामुळे बेसल डोसवर जास्त भर दिला गेला तर 8-10 दिवसांच्या अंतराने पाण्यामधून विद्राव्य खते सोडण्यात आली व विद्राव्य खतांव्दारे पोंगे भरणी करण्यात आली यामध्ये 19:19:19 ,12:61:00, 13ः40ः13, 13ः00ः45, 00:52:34, 00ः00ः50 व 00ः60ः20 तर पूर्ण वर्ष भराच्या कालावधीत फक्त दोन वेळाच बुरशीनाशक कीटकनाशकांची फवारणी केल्याचे जगताप सांगतात.
पहिली तोड 11 ते 12 महिन्यांनी
केळी लागवड केल्यानंतर सुमारे 5-6 महिने पिकाला खते द्यावी लागतात. त्यानंतर पीक हे स्वतःमध्ये साठवलेल्या अन्नाच्या वापरावर पुढे प्रक्रिया करते. तर 7 महिन्या नंतर येण पडते म्हणजे कमळ बाहेर पडते व फळधारणेस सुरुवात होते. साधारणत: पहिला तोडा 11 ते 12 महिन्यांमध्ये केला जातो.तर तीन टप्यांमध्ये माल उतरविला जातो.
13 किलोचे बॉक्स पॅकिंग
सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा येथील ए.के. फ्रुटस् अनिकेत काळे) व्यापा-यांनी जगताप यांच्या मालाची खरेदी केला आहे. तर 13 कीलोच्या बॉक्स पॅकिंग करून ते 5 ते 6 दिवस कोल्ड स्टोरेजला ठेवून शीपमेंटमध्ये निर्यात करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जगताप यांच्याकडून व्यापा-याने 13 रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी केला. तर तीन टप्प्यांत काढणी करते वेळी 20 ते 25 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळण्याची अपेक्षा जगताप व्यक्त करतात.
एकरी आलेला खर्च
मशागत***15 हजार
रोपे***23 हजार
बांधणी***10 हजार
बेलसर डोस***25 हजार
ड्रिप***25 हजार
लेबर, इतर खर्च***27 हजार
एकूण*** 1 लाख 25 हजार
70 टन उत्पन्न; 5 लाखांच्या नफ्याची अपेक्षा
केळी लागवडीपासून ते काढणीपर्यंत जवळपास एका एकरासाठी 1 लाख 25 हजार रुपये खर्च येतो. तर जगताप यांच्या 2 हजार रोपांसाठी 2 लाख रुपये खर्च झाला आहे. उत्पन्न 2 हजार झाडांमध्ये जवळपास 70 टन उत्पन्नाची अपेक्षा जगताप यांनी व्यक्त केली आहे. तर सध्याच्या बाजारभाव प्रमाणे साधारणत: 7 लाख रुपये उत्पन्न मिळेल.2 लाख खर्च वजा जाता 5 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहिल अशी अपेक्षा आहे.
तरुण शेतकर्यांनी केळी पिकाकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे. इतर पारंपरिक पिकांपेक्षा हे पिक अत्यंत फायदेशीर आहे. केळी पिकाची लागवड पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. तर तरकारी पेक्षा फळबागा लागवड करुन शेतकर्यांनी अधिक आर्थिक नफा मिळविला पाहिजे. – सम्राट जगताप, केळी उत्पादक शेतकरी





