यश विद्यार्थ्यांचे, चमकोगिरी नगरसेवकांची

दहावी, बारावीच्या पालिकेच्या अर्थसहाय्यावरून श्रेयवादाची लढाई
पिंपरी – दहावी व बारावीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेकडून आर्थिक पारितोषिक दिले जाते. या पारितोषिकावरून शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांनी चमकोगिरी सुरू केल्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षेत 80 टक्क्यांहून अधिक गुण घेऊन यश मिळविल्यास महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. दहावीमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास 10 हजार रुपये तर 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले असल्यास 15 हजार रुपये रोख स्वरुपात दिले जातात. तर बारावीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यास 15 हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही योजना महापालिकेकडून राबविली जाणार आहे. याबाबत सध्या पालिकास्तरावर कोणतीही हालचाल नसून 15 ऑगस्टनंतर कार्यवाही केली जाणार आहे.
मात्र तत्पूर्वीच शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांनी ही रक्कम आपण स्वत:च वाटत असल्याचा “आव’ आणत सोशल मीडियावर चमकोगिरी सुरू केली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनी तर आपल्या स्थानिक, राज्यपातळीवरील तसेच राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची छबीदेखील या चमकोगिरीसाठी वापरली आहे.
गुणगौरव समारंभ, अभीष्टचिंतन सोहळा या नावाखाली प्रसिद्धी अनेकांनी चालविली आहे. विशेष म्हणजे आपल्या स्वत:च्या कार्यालयात गुणपत्रकाच्या प्रतिही मागविण्याचा कार्यक्रम काही अतिहुशार मंडळींनी चालविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. करोनाच्या काळात नागरिकांना मदत करण्याऐवजी महापालिकेच्या योजनेवरून स्वत:ची पोळी भाजण्याची तसेच श्रेयवादाची सुरू झालेली स्पर्धा हा सध्या शहरात चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.





