Success Story : गणेशोत्सवात गुलाब शेतीत झेंडूच्या आंतरपिकातून माळेगावच्या महिला शेतकऱ्याचे यश

माळेगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माळेगाव येथील महिला शेतकरी सविता अजित वाबळे यांनी गुलाब शेतीत झेंडूचे आंतरपिक घेऊन विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. अवघ्या वीस गुंठ्यांत त्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले असून, परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
मे महिन्यात त्यांनी बोर्डेस जातीच्या चार हजार गुलाब रोपांची लागवड केली. रोपांसाठी साठ हजार रुपये खर्च करून ठिबक सिंचन यंत्रणा वापरण्यात आली. गुलाब व झेंडूचा बहार ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्याने नेमके गणेशोत्सवात फुलांची विक्री करता आली. गुलाबाला प्रति किलो ३०० ते ४०० रुपये तर झेंडूला सरासरी ८० ते १०० रुपये दर मिळाला.
सविता वाबळे यांनी सांगितले की, गुलाब व झेंडूच्या उत्पादनासाठी साधारण एक लाख रुपये खर्च आला होता, जो गणेश चतुर्थी व गौरी उत्सवात विक्री करून पूर्णपणे वसूल झाला आहे. सध्या पुणे येथील फूल बाजारात फुले विक्रीसाठी पाठवली जात आहेत.
परिसरातील शेतकरी गुलाब शेतीकडे वळले
- सविता वाबळे यांची प्रेरणा घेऊन वडगाव निंबाळकर, जळकेवाडी व माळेगाव परिसरातील अनेक शेतकरी गुलाब शेतीकडे वळले आहेत.
- शेती ही केवळ पुरुषांची मक्तेदारी नसून महिलादेखील आधुनिकतेचा वापर करून यशस्वी शेती करू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
- कुटुंबाचा पाठिंबा, पती अजित वाबळे यांची साथ आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे सविता वाबळे आता दीड एकर शेतीत गुलाब लागवड करणार आहेत.





