Subodh Bhave : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मध्ये सुबोध भावे महत्त्वाच्या भूमिकेत; तिसरा टीझर रिलीज
Subodh Bhave : अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? हे अजूनही गुलदस्त्यात

Subodh Bhave : राजकारण, गुन्हेगारी आणि सत्तेच्या पडद्याआड शिजणारी कटकारस्थाने यातून उलगडणारे धक्कादायक रहस्य ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला असून, या सिनेमात दिग्गज अभिनेते सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ या बहुचर्चित सिनेमाचा बहुप्रतिक्षित तिसरा टीझर अखेर रिलीज झाला आहे. या सिनेमाचे दोन टीझर आधी रिलीज झाले होते. या सिनेमाच्या टीझरमुळे प्रेक्षकांची हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सिनेमात अभिनेत्री आणि बिग बॉस फेम दिपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच उदय टिकेकर यांचीही या सिनेमात भूमिका असणार आहे.
आता ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ या सिनेमाचा तिसरा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांची हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्स्ट लूकमध्ये सुबोध भावेचा रुबाबदार आणि करारी अवतार विशेष लक्ष वेधून घेत आहे. पांढराशुभ्र कुर्ता, त्यावर काळ्या रंगाचे बंद गळ्याचे जॅकेट आणि नजरेतील भेदक गांभीर्य यांमुळे सुबोध एका वजनदार, मुरब्बी आणि तत्त्वनिष्ठ राजकीय नेत्याच्या रूपात समोर आले आहेत.
“मंत्री असो की आमदार असो… जो कोणी दोषी असेल, त्याला कायद्याच्या चौकटीत यायलाच लागेल. त्याची गय केली जाणार नाही.” हा त्याच्या तोंडी असलेला खणखणीत संवाद व्यवस्थेतील गैरप्रवृत्तींना दिलेला निर्वाणीचा इशाराच ठरतो. सुबोध भावे या सिनेमात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहेत, असं त्यांच्या लुकवरून आणि बोलण्याच्या पद्धतीवरून दिसून येत आहे.
अशोक खरातची भूमिका कोण साकारणार?
मात्र या सिनेमात अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? हे अजूनही गुलदस्त्यात असून, हे लवकरच उघड होईल. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले होते. या प्रकरणात अशोक खरातचा तपास करुन त्याला अटक करण्यात आली आहे. स्वत:मध्ये अद्भुत शक्ती असल्याचं भासवत त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले.
अशोक खरातने भोंदूगिरी, बनावट रुद्राक्ष, मध विकून तब्बल 47 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याची माहिती ईडी तपासातून उघड झाली होती. या प्रकरणी काही राजकीय नेत्यांसोबत अशोक खरातचे काही फोटो समोर आले होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.
हेही वाचा :
Chocolate Peda: अवघ्या काही साहित्यांत बनवा चॉकलेट पेढे; दिवाळीच्या फराळात आणा गोड ट्विस्ट!





