“शवविच्छेदनाचे अहवाल तातडीने सादर करा”: दिलीप वळसे यांची सूचना

जांबूतमध्ये जोरी कुटुंबीयांची भेट
जांबूत – बिबट हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल तातडीने सादर करून घडलेल्या घटनेचा योग्य तपास करावा, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.
जांबूत (ता. शिरूर) येथे मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सचिन बाळू जोरी यांच्या कुटुंबीयांची वळसे पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पठारे, पदाधिकारी उपस्थित होते.
ही घटना दुर्दैवी असून शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
शवविच्छेदन अहवाल तात्काळ देण्यासंदर्भातील सूचना पोलीस प्रशासनासह संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. सर्व वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर वनविभागाचे अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असा आदेश त्यांनी यावेळी दिला.
पिंजरे आणि बोर्ड लावावेत
बेट भागात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी, नागरिक व शालेय विद्यार्थी यांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. वाढलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे प्रमाण लक्षात घेता वनविभागाचे वतीने बिबट्या प्रवण क्षेत्रात पिंजरे लावून उपाययोजनात्मक बोर्ड लावणे आवश्यक आहे. ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे. त्या भागात विज खांबावर दिवे बसविणे गरजेचे आहे.





