महाराष्ट्राची मान शरमेने खाली..! शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग, पाळीच्या संशयातून 125 मुलींची गणवेश काढून तपासणी

शहापूर (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील आर. एस. दामानिया इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये एक अत्यंत निंदनीय आणि संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्याने मासिक पाळीच्या संशयातून इयत्ता सहावी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थिनींचे गणवेश काढून त्यांची तपासणी करण्यात आली.
या अमानवीय कृत्यामुळे मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संतप्त पालकांनी शाळा आणि पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्यासह आठ जणांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून, प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
अमानवीय कृत्य, मुलींचे गणवेश आणि अंतर्वस्त्रे काढून तपासणी
मंगळवारी (8 जुलै 2025) शहापूर येथील या नामांकित शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळले. याचा तपास करण्यासाठी प्राचार्यांनी सहावी ते दहावीच्या सुमारे 125 विद्यार्थिनींची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेतील महिला कर्मचाऱ्यांमार्फत या मुलींचे गणवेश आणि अंतर्वस्त्रे काढून त्यांची तपासणी करण्यात आली. इतकेच नव्हे, तर शाळेत पाण्याचा तुटवडा असल्याने मुलींनी भिंतीवर पुसलेले रक्ताचे डाग प्रोजेक्टरद्वारे सर्व विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. काही मुलींच्या बोटांचे ठसेही घेण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या अमानवीय तपासणीमुळे मुलींवर गंभीर मानसिक आघात झाला. घरी परतल्यानंतर अनेक मुलींनी रडत रडत पालकांना हा प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी बुधवारी (9 जुलै 2025) सकाळी शाळेत धाव घेऊन प्राचार्यांना जाब विचारला. पालकांचा रोष पाहून प्राचार्यांनी पोलिसांना माहिती दिली, ज्यामुळे शाळा परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पालकांनी यानंतर शहापूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शहापूरचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांनीही संस्थाचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पालकांच्या तक्रारीनंतर शहापूर पोलीस ठाण्यात प्राचार्यासह चार शिक्षिका आणि इतर तीन कर्मचाऱ्यांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. प्राचार्य आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांनी प्राचार्यांना बडतर्फ करण्याबाबत संस्थाचालकांनी पत्र पाठवल्याचे सांगितले. तसेच, नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालकांना दिले. गटशिक्षणाधिकारी रामचंद्र विशे यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुलींच्या स्त्रीत्वाचा अपमान
या बीभत्स प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक मुली शाळेत जाण्यास घाबरत असल्याचे पालकांनी सांगितले. “हा केवळ अमानवीय प्रकार नाही, तर मुलींच्या स्त्रीत्वाचा अपमान आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.





