Satara: ‘हिरवाई’च्या उपक्रमात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश
Satara या कार्यक्रमाला मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशनच्या संचालिका अपर्णा अनिल देसाई आणि गीता मामणिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कोडोलीतील लोकमंगल हायस्कूल, यशदायिनी विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्रमांक ११ आणि नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक १२ या शाळांतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

Satara: दिवाळीचा आनंद साजरा करतानाच पर्यावरण संवर्धनाची जाणीव मुलांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हिरवाई प्रकल्पाच्यावतीने रविवारी ‘पर्यावरणीय दिवाळी’ साजरी करण्यात आली. ‘फटाके की पुस्तके?’ या कवितेच्या सादरीकरणापासून ते पर्यावरणपूरक आकाशकंदील तयार करण्यापर्यंत विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी यावेळी एकही फटाका न उडविण्याचा उत्स्फूर्त संकल्प केला.
या कार्यक्रमाला मुक्तागिरी मुक्तांगण सोशल फाउंडेशनच्या संचालिका अपर्णा अनिल देसाई आणि गीता मामणिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कोडोलीतील लोकमंगल हायस्कूल, यशदायिनी विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्रमांक ११ आणि नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक १२ या शाळांतील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
अपर्णा देसाई म्हणाल्या, “अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमातून दिवाळीवेळी सामाजिक जाणीवा रुजविण्याचे महत्त्वाचे काम हिरवाईकडून होत आहे. शाळांनी प्रार्थनेच्या वेळी परिपाठातून अशा पर्यावरणविषयक जाणीवा रुजविण्यासाठी थोडा वेळदिल्यास मोठा सकारात्मक बदल घडू शकतो.’’ गीता मामणिया यांनी पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांचे महत्त्व सांगितले. या निसर्गघटकांचा आदर करून पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमाची २५ वर्षांची परंपरा सांगून हिरवाई प्रकल्पाच्या प्रा. संध्या चौगुले यांनी प्रास्ताविकात कातकरी वस्तीतील मुलांसोबत सुरु झालेला हा दिवाळी उपक्रम आजही सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुलांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांच्या मनात पर्यावरणाबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला श्रुतिका चौगुले आणि धनंजय चौगुले यांनी ‘फटाके की पुस्तके?’ ही कविता सादर केली. या कवितेतून फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि पुस्तकांचे महत्त्व यांवर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना कागदी पणत्या आणि आकाशकंदील तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आकाशकंदिलांवर वृक्ष लागवड, पाणी बचत, पर्यावरण संवर्धन आणि फटाकेमुक्त दिवाळीचे संदेश लिहिले. याशिवाय याच विषयांवर चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आल्या.
हिरवाईच्या गर्द सावलीत शैक्षणिक भेटवस्तू आणि गोड फराळाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. श्रुतिका चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी मस्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दीपाली मोरे, शीतल इंगुळकर, दिया खांडेकर, वैशाली ढोले, शेख रफ्त अंजुम सय्यद हसन अली आणि बाळकृष्ण इंगळे यांनी सहकार्य केले.





