Pakistan News : पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात विद्यार्थ्यांचे आंदोलन

लाहोर – पंजाब प्रांतात लाहोरमधील पंजाब कॉलेज फॉर वुमनमध्ये एका विद्यार्थिनीवर सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले असून पंजाब सरकारने प्रांतातील सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवसांसाठी बंद केल्या आहेत आणि ६०० हून अधिक विद्यार्थ्यांना अटक केली आहे.
विद्यार्थ्यांची निदर्शने आणि तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने निदर्शने करण्याचे आवाहन या दोन्हीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी घातली आहे. अटक केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून हमीपत्र घेतल्यानंतर सोडण्यात आले आहे, असे पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.
दुसरीकडे, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला आणि डझनभर विद्यार्थी जखमी झाले. सरकार आणि पोलिस विद्यार्थ्यांशी कठोर गुन्हेगारांसारखी वागणूक देत आहेत, असे पालकांनी सांगितले.
विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराचे वृत्त सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारपासून विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. निदर्शनांमध्ये किमान ५० विद्यार्थी जखमी झाले आहेत, त्यापैकी तीन गंभीर आहेत. दरम्यान बलात्काराचा कोणताही पुरावा सापडला नाही आणि ही खोटी बातमी आहे, असे मुख्यमंत्री मरियम नवाज म्हणाल्या.
दरम्यान, फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या सायबर क्राईम विंगने पंजाबमध्ये हिंसक निदर्शने करण्यासाठी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांना भडकावणाऱ्या बलात्काराची कथित खोटी बातमी पसरवल्याबद्दल काही ज्येष्ठ पत्रकार, वकील, टिकटोकर यांच्या अटकेसाठी प्रांतव्यापी छापे टाकले.





