Satara : झेडपीच्या शिक्षण विभागाचा राज्यात डंका

सातारा : प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीने ‘असर’ चा २०२४ चा अहवाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी गणित विषयाच्या संपादणुकीमध्ये राज्यात अव्वल ठरले आहेत. भाषा विषयाच्या संपादणुकीमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकावर सातारा आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा राज्यात पुन्हा एकदा डंका दिसून आला आहे.
प्रथम एज्युकेशन फाउंडेशन असर (ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्स) चे सर्वेक्षण दर दोन वर्षांनी करते. हे सर्वेक्षण पूर्णतः बाह्य यंत्रणेमार्फत केले जाते. प्रथमने मंगळवारी जाहीर केलेल्या असर अहवालानुसार तिसरी ते पाचवीच्या भाषेमध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 50.3 असून सातारा जिल्ह्याची सरासरी संपादणूक 79.3 आहे. तिसरी ते पाचवीच्या गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 46.2 असून सातारा राज्यात अव्वल असून सरासरी संपादणूक 84.7 आहे.
सहावी ते आठवीच्या भाषा विषयाची महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 69.4 असून साताऱ्याची सरासरी 90.4 आहे. गणितामध्ये महाराष्ट्राची सरासरी संपादणूक 35.4 एवढी असून सातारा गणितामध्ये राज्यात अव्वल असून सरासरी संपादणूक 63.5 इतकी आहे.
असर 2022 मध्ये महाराष्ट्रात सरासरी संपादणुकीमध्ये सातारा तिसरी ते पाचवीच्या भाषेत आणि गणितामध्ये 8 व्या क्रमांकावर, सहावी ते आठवीच्या भाषा विषयाच्या सरासरी संपादणूकीमध्ये महाराष्ट्रात सातारा ५ व्या स्थानी तर गणितात 8 व्या स्थानी होता. गेल्या वर्षापासून राबविलेल्या आदर्श शाळा उपक्रम तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवल्यामुळे जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती झाल्याचे स्पष्ट झाले येते.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीपासूनच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे नियोजन केले. त्यानुसार एकूण १६ अभ्यास गटांची निर्मिती करून त्यांच्यामार्फत उपक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये केली. या कार्यक्रमांतर्गत गुढीपाडवा- पट वाढवा, चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षा, पाचवी शिष्यवृत्तीचे ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग, यशवंत प्रयोगशाळा सक्षमीकरण, ज्ञानचक्षु वाचनालय सक्षमीकरण, परसबाग निर्मिती, आनंददायी अभ्यासक्रम निर्मिती या उपक्रमांच्या अंमलबजावणीमुळे असर २०२४ मध्ये सातारा जिल्ह्याने राज्यामध्ये अव्वल कामगिरी केली.
शिक्षण विभागाने राज्यात अव्वल कामगिरी केल्याबद्दल याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन होत आहे.
सातारा जिल्ह्याने आदर्श शाळा उपक्रमाची अंमलबजावणी व्यवस्थित केली आहे. जिल्ह्यातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, सर्व अधिकारी व डायट यांनी संघटितपणे कार्य केल्याने असर 2024 मध्ये जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवत्ता आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न आहे.
– याशनी नागराजन (मुख्य कार्यकारी अधिकारी)





