उद्योजकतेसाठी विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी व दुरदृष्टीकोन हवा; पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष देशकर यांचे मत

पुणे – विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात विकासात्मक बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थ्यांकडे जिद्द, चिकाटी व दुरदृष्टीकोन असला पाहिजे, असे मत पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. डी.जी.देशकर यांनी व्यक्त केले आहे.
येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार व उद्योजकता या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गौतम बनसोडे, गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्रा. नामदेव डोके, कार्यक्रम समन्वयक प्रा. शिवाजी मोटेगावकर आदी उपस्थित होते.
जगात उद्योजकतेच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या संधीचा लाभ घेण्याचा विचार विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे. उद्योजकता प्रत्येकाच्या मनात असते. आत्म संशोधनवृत्ती बाळगून जागृकता निर्माण करण्याची गरज आहे. मोठे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवून लोकांचा विश्वास संपादन करुन चांगले उद्योजक बनता येईल, असे डॉ. डी.जी.देशकर यांनी स्पष्ट केले आहे.
ग्राहकांना काय हवे आहे हे जाणून घेऊनच व्यवसाय, रोजगार उभारला पाहिजे. व्यवसायात गुणवत्ता असला पाहिजे. करिअर विविध क्षेत्रात करता येते. मात्र प्रयत्नपुर्वक करिअरची निवड करायला हवी आहे. सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरी या पेक्षा विद्यार्थ्यांनी विविध व्यवसायाला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत प्रा. नामदेव डोके यांनी व्यक्त केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शिवाजी मोटेगावकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.कैलास शिंदे यांनी करुन दिला. आभार प्रा.सचिन कांबळे यांनी मानले.





