Pimpri school : शाळांसमोर विद्यार्थ्यांचा रोज जीव मुठीत; भरधाव वाहतुकीचा धोका
Pimpri school : झेब्रा क्रॉसिंग पुसले, गतिरोधक गायब; शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतूक नियंत्रणाची गरज

पिंपरी – शाळेची घंटा वाजते आणि विद्यार्थ्यांची लगबग सुरू होते. काही मिनिटांतच शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर गर्दी वाढते. पालकांची वाहने, रिक्षा आणि स्कूल व्हॅनची रांग लागते. त्याचवेळी मुख्य रस्त्यावरून भरधाव वाहने धावत असतात. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. अनेक शाळांसमोर सुरक्षित पादचारी मार्ग नाही. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे पुसले आहेत. गतिरोधकही अनेक ठिकाणी नाहीत. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका, खासगी आणि सीबीएसई शाळांची संख्या मोठी आहे. अनेक शाळा प्रमुख रस्त्यांच्या लगत आहेत. पुणे-मुंबई महामार्ग परिसर, पिंपरी, चिंचवड, थेरगाव-वाकड लिंक रोड, आकुर्डी-प्राधिकरण मार्ग, भोसरी-आळंदी रस्ता आणि मोशी परिसरात मोठी वाहतूक असते.
या रस्त्यांलगत शाळा असल्याने विद्यार्थ्यांना सतत वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागतो. सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळीही मोठी गर्दी होते. एकाच वेळी सकाळच्या सत्रातील शाळा सुटताना आणि दुपारच्या सत्रातील शाळा भरताना परिस्थिती आणखी गंभीर होते.
रिक्षा आणि स्कूल व्हॅनची गर्दी
शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर रिक्षा आणि स्कूल व्हॅन उभ्या राहतात. काही वाहने रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त थांबतात. त्यामुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होते. एकीकडे वाहनांची गर्दी असते. दुसरीकडे विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू असते. या गोंधळात वाहतुकीचा वेग कायम राहतो. त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
पदपथावर अतिक्रमण
शाळांजवळील पदपथही अनेक ठिकाणी अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. तसेच काही विक्रेते शाळा सुटण्याच्या वेळी हातगाड्या लावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. काही ठिकाणी फुटपाथची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अगदी जवळून वाहने जातात. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष
शाळांच्या परिसरात आवश्यक वाहतूक सुरक्षा उपायांची कमतरता जाणवते. अनेक ठिकाणी ‘शाळा पुढे आहे’ असे सूचना फलक दिसत नाहीत. झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे अस्पष्ट झाले आहेत. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी प्रभावी गतिरोधकांचीही गरज आहे. काही ठिकाणी असलेले गतिरोधकही स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना वेग कमी करण्यास अडचण होते.
शाळा सुटताना वाहतूक नियोजन हवे
शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत वाहतूक पोलिसांची उपस्थिती आवश्यक आहे. गर्दीच्या शाळांबाहेर विशेष वाहतूक नियोजन करावे. रिक्षा आणि स्कूल व्हॅनसाठी स्वतंत्र थांबा निश्चित करावा. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. शाळांच्या गेटसमोरील अतिक्रमणे हटवावीत. झेब्रा क्रॉसिंग नव्याने आखावेत. आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवावेत.
अपघातानंतर उपाययोजना नको
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ शाळा प्रशासनावर सोपवून चालणार नाही. महापालिका, वाहतूक पोलीस आणि शाळा प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरातील सर्व शाळांच्या परिसराचे सुरक्षा ऑडिट करावे. धोकादायक ठिकाणांची यादी तयार करावी. त्यानुसार तातडीने उपाययोजना कराव्यात. अपघात घडल्यानंतर उपाय करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
‘शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होते. त्याचवेळी रस्त्यावर वाहनांचीही वर्दळ असते. त्यामुळे शाळांसमोर गतिरोधक, स्पष्ट झेब्रा क्रॉसिंग आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.’- नीलम मोहिते, चिंचवड स्टेशन





