MPSC Movement : राजकीय नेत्यांची फळी मैदानात
MPSC Movement :

एमपीएससी आंदोलनाचा सहावा दिवस; सत्ताधाऱ्यांचा पलटवार
MPSC Movement : एमपीएससीच्या कारभाराविरोधात स्पर्धा परीक्षार्थींचे सत्याग्रह आंदोलन सहाव्या दिवशी अधिकच आक्रमक झाले आहे. एस. एम. जोशी पुलाजवळ आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांनी स्वप्नांची प्रतीकात्मक तिरडी काढून भ्रष्ट यंत्रणेचे दहन केले.
आज दिवसभरात शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे, आपचे खासदार संजय सिंह, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, तुषार गांधी, आमदार जयंत पाटील, रोहिणी खडसे आणि डॉ. अमोल कोल्हे या प्रमुख नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.
एकजूट फुटू देऊ नका- आदित्य ठाकरे
एमपीएससी अध्यक्ष भीमनवार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. सरकारने राजीनामा न घेतल्यास सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत मुंबईतील एमपीएससी कार्यालयासमोर आंदोलन करावे. प्रशासन आणि सरकार तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करेल; पण त्याला बळी पडू नका, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री धाडस करणार का?
राज्यात पारदर्शक व स्वच्छ कारभारासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागत आहे, हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल. उद्याची पिढी धडविणाऱ्या लोकांकडूनच परीक्षेचे पेपर सेटिंग केले जाते, ही चिंताजनक बाब असून, आता विचार करण्याची वेळ आली आहे. आर. आर. पाटील यांनी खुद्द एका आयपीएसी अधिकाऱ्यांवर कारवाईचे धाडस केले होते. आता मुख्यमंत्री भीमनवार यांच्यावर कारवाई करणार का, असेही आमदार रोहित पाटील म्हणाले.
…तर पुणेकर उत्तर देतील
शास्त्री रोडवरील अहिल्याबाई अभ्यासिकेबाहेर सुरू असलेल्या आंदोलनाला विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी भेट देऊन विरोधकांवर जोरदार टीका केली. एमपीएससी अध्यक्षांवर कारवाईची घटनात्मक प्रक्रिया सुरू असताना आंदोलनाला चुकीच्या दिशेने नेऊन अराजकता माजवली जात असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी पुणे बंदची भूमिका घेतली, तर पुणेकरच चोख उत्तर देतील, असे ते म्हणाले.





