दंत तपासणी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे – भारती विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन, धनकवडी आणि भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. २० ऑगस्ट) दंत तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दंत आरोग्याविषयी जागरूकता दाखवली.
शिबिराचे आयोजन दंत महाविद्यालयाचे डॉ. अमर शा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये दंत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच मोफत दंत तपासणी आणि मार्गदर्शन करणे, हे या शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते. तज्ञ दंतचिकित्सकांनी सहभागींची तपासणी करून दातांची स्वच्छता, रोगप्रतिबंधक उपाय आणि दंत आरोग्याचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. आवश्यकतेनुसार उपचारांच्या सूचनाही देण्यात आल्या.
या शिबिराला सुमारे ४०० विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले. प्राचार्य ऋषिकेश देशमुख आणि उपप्राचार्य अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराची यशस्वी सांगता झाली.
शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंत आरोग्याविषयी सजगता निर्माण झाली असून, उपयुक्त माहिती मिळाल्याबद्दल सहभागींनी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्य जागरूकता वाढण्यास मदत होत असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.





