पुणे जिल्हा | उस्फूर्त वाचन उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग

लोणी काळभोर, (वार्ताहर) -येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ’वाचन प्रेरणा दिन’ हा ग्रंथ प्रदर्शन, भितीपत्रिका अनावरण व उत्स्फूर्त वाचन या विविध उपक्रमांनी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन मराठी विभागप्रमुख प्रा. बाळासाहेब जगताप, हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. आर. निकम, ग्रंथपाल एस. एम. शेख, मराठी विभागाचे डॉ. विजयकुमार घोडके, प्रा. पी. एम. खनुजा यांच्या हस्ते पार पडले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ’मिसाइलमॅन’ या भीत्तीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद् घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ’उस्फूर्त वाचन’ या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे डॉ विजयकुमार घोडके यांनी, प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा बाळासाहेब जगताप यांनी तर आभार ग्रंथपाल सौ एस एम शेख यांनी मानले.





