ढाका- बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या संघटनेने स्थापन केलेल्या नॅशनल सिटीझन्स पार्टी राजकीय पक्षाला निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाने सहभाग घ्यायला विरोध केला आहे. पक्षाचा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचा नेता नहीद इस्लाम याने अमेरिकेतून चालवल्या जाणाऱ्या चालू घडामोडींविषयीच्या एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ही भूमिका स्पष्ट केली. आवामी लीग पक्षातील नेत्यांनी जी गैरकृत्ये केली आहेत, त्यांच्यावर आगोदर खटले चालवायला हवेत, असे इस्लाम म्हणाला. मात्र आपण कोणत्या नेत्यांबाबत बोलत आहोत, हे त्याने स्पष्ट केले नाही. राज्यघटना सभेच्या माध्यमातून दुसरे प्रजासत्ताक निर्माण करण्याचा आणि देशातील सत्ताकारणाची पेररचना करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे इस्लामने सांगितले. दुसऱ्या प्रजासत्ताकामध्ये पहिल्यांदा १९७१ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि जुलैमधील आंदोलनाच्या प्रेरणेच्या आधारे नवीन राज्यघटना आणण्यास आपले प्राधान्य असेल. समतोल आणि लाभदायक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्याचे धोरण परराष्ट्र संबंधांबाबत अवलंबले जाईल, असेही त्याने सांगितले. पुर्वीच्या सरकारचा भारताबरोबरच्या संबंधांवर भर होता. मात्र आम्ही भारत किंवा पाकिस्तान दोन्ही देशांवर अवलंबून न राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. आवामी लीगच्या सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाचा सहभाग निवडणुकांमध्ये नको असल्याचे त्याने सांगितले.