विद्यार्थी निवडणुकांचा बिगुल विधानसभेपूर्वीच
पुणे – राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच या विद्यार्थी निवडणुका होणार असल्याने आता हालचालींना वेग येण्यास सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या कलम 99 नुसार सर्व सार्वजनिक विद्यापीठांर्गत संलग्नित महाविद्यालये व परिसंस्थांमध्ये विद्यार्थी निवडणुका होणार आहेत. याबाबत दि.26 ऑक्टोबर 2018 रोजी परिनियम शासनाने प्रसिद्ध केले आहेत. सन 1993 नंतर आता महाविद्यालयात पुन्हा नवीन पद्धतीने विद्यार्थी निवडणुका होणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या निवडणुकांबाबत पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यातील मान्यता प्राप्त महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवस कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. यात अनेक अडचणींवर चर्चा झाली होती.
बुधवारी (दि.17) मुंबई येथे परिनियम समितीचे सदस्य माजी कुलगुरू आर. एस. माळी यांच्यासह इतर सदस्य, राज्यातील सर्व विद्यापीठामधील प्र-कुलगुरू, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक, कायदा अधिकारी यांची महत्त्वाची बैठक झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, वरिष्ठ कायदा अधिकारी परवीन सय्यद आदी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने बहुसंख्य बाबींवर चर्चा करण्यात आली. अनेकांनी आपआपल्या पद्धतीने विषय मांडले. विद्यापीठांनी आपल्या सोयीने तयार केलेले निवडणूक कार्यक्रम मांडण्यात आले. महाविद्यालयात विविध शाखांची प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत सुरू असते.
या प्रक्रियेतील विद्यार्थी निवडणुकीपासून वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी प्रत्येक विद्यापीठांनी घ्यावी. विद्यापीठांनी विचार विनियम करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करावेत, अशा सूचना समितीने बैठकीत विद्यापीठांना दिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम येत्या आठवडाभरात जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दि.30 सप्टेंबर पूर्वी विद्यार्थी परिषद स्थापन करणे कायद्याने बंधनकारक असल्याने याचा विचार करून निवडणुकीची सर्व प्रक्रिया निश्चित करण्यात येणार आहे.





