पिंपरी | पवना नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

शिरगाव, (वार्ताहर) – पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गहुंजे येथे शनिवारी सायंकाळी घडली. निखील ओमप्रकाश यादव (वय १६ रा. देहूरोड) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील हा देहूरोड येथील सेंट जोसेफ इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत होता.
सध्या शाळांना सुट्टी असल्याने तो शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी तो मित्रासमवेत गहुंजे येथे पवना नदीवर आला होता. तेथे पोहण्यासाठी पाण्यात उतरला. परंतु त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने व त्याला चांगले पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
या घटनेची माहिती समजताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ, अपदा मित्र मंडळ व शिवदुर्ग मित्र मंडळच्या तरुणांनी पाऊस सुरू असतानाही पाण्यात शोध घेऊन रात्री निखिलला पाण्याबाहेर काढले. त्याला उपचारासाठी पवना रुग्णालयात नेले असता तेथे उपचापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.





