जळगाव – ‘द डेथ क्लाॅक’ या वेबसाईटवर माहिती पाहून जळगाव जिल्ह्यातील तुकारामवाडी येथे आठवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हर्षल दीपक कुंवर (वय 14, रा. शिंदखेडा, जि. धुळे) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो तुकारामवाडी येथे मामाच्या घरी राहण्यासाठी आला होता.
प्रजासत्ताक दिनी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ‘द डेथ क्लाॅक’ या वेबसाइटवर आयुर्मान कॅलक्युलेटरवर मृत्यूचे भाकीत बघून हर्षल ने साडीने गळफास घेऊन हे टोकाचे उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संबंधीत संकेतस्थळ बंद करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे –
‘द डेथ क्लाॅक’ या वेबसाइटवर मृत्यूचे भाकीत देण्यात आले आहे. त्यांच्याकडे लाखो लोकांचा डाटा असू शकतो. त्याला अधिकृतता नाही. कोण किती दिवस जीवंत राहणार हे कोणीही सांगू शकत नाही. वेबसाइटवर आऊटलूक परिमाण आठवीच्या मुलाला समजणे अवघड आहे. त्यामुळे मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे, असे पोलिस दलातील सायबरतज्ज्ञ नरेंद्र वारूळे यांनी सांगितले.