जिद्दीने स्वप्न केलं पूर्ण, नियतीने हिरावून घेतलं; डोंबिवलीकर क्रू मेंबर रोशनीचा विमान दुर्घटनेत अंत

Ahmedabad Plane Crash | अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या AI171 विमानाचा गुरुवारी भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत विमान विमानतळाच्या हद्देबाहेर कोसळले. एअर इंडियाच्या विमानाच्या या भीषण अपघातात २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील २४ जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे एकूण २६५ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमध्ये डोंबिवलीमधील एक तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये २७ वर्षीय रोशनी सोनघरे फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती.
रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भावासोबत राहत होती. मुंबई ग्रांट रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. रोशनी हिचा भाऊ विघ्नेश हा एका खाजगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झालं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवलं.
१२ क्रु मेंबर्ससह २३० प्रवाशांचा मृत्यू
रोशनीला लहानपणा पासूनच एअर क्रु मेंबर बनायचं होतं. तिने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. गुरुवारी आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली. अहमदाबाद विमानतळावरून एअर इंडियाच्या फ्लईटने ती लंडनच्या दिशेनं निघाली होती. मात्र आज गुरुवारी दुपारी विमानाचा अपघात झाला. या अपघातात १२ क्रु मेंबर्ससह २३० प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Ahmedabad Plane Crash |
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर कु. रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिच्या आत्म्यास सद्गती लाभो !
सोनघरे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून… pic.twitter.com/4NpDiw4CV2
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) June 12, 2025
रवींद्र चव्हाण ट्वीट
भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. ‘अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. तिच्या आत्म्यास सद्गती लाभो ! सोनघरे कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! भावपूर्ण श्रद्धांजली !’
१२ क्रू मेंबर्सपैकी ४ क्रू मेंबर मराठी
दरम्यान, या भीषण दुर्घटनेत एकमेव प्रवासी, विश्वशकुमार रमेश (सीट 11A), सुदैवाने बचावला. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातग्रस्त विमानातील १२ क्रू मेंबर्सपैकी ४ क्रू मेंबर हे मराठी आहेत. त्यातील अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचा सख्खा भाचा अमोल यांच्या पत्नी आहेत. त्या एअर इंडियात सीनियर केबिन क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती अमोल हेही एअर इंडियात पायलट म्हणून कार्यरत आहेत.
याशिवाय, मैथिली पाटील, दीपक पाठक व रोशनी सोनघरे हे क्रू मेंबरही मराठी आहेत. मैथिली पाटील ही पनवेल (जि. रायगड) येथील असून ती एअर होस्टेस होती. तर डोंबिवलीतील (जि. ठाणे) येथील रोशनी सोनघरे ही क्रू मेंबर होती. तसेच, दीपक पाठक (रा. बदलापूर, जि.ठाणे) हेही केबिन क्रू मेंबर म्हणून विमानात कर्तव्यावर होते. Ahmedabad Plane Crash |
हेही वाचा:
Ramesh Vishwashkuma : विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने सांगितला धक्कादायक प्रसंग?





