पुणे | एसटीची मालवाहतूक सेवा ठप्प

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – करोना काळात एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी मालवाहतूक सेवा सुरू केली. यातून महामंडळाला चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, सध्या पुणे विभागातून मालवाहतुकीला मागणी असताना एसटी महामंडळाकडून वाहने उपलब्ध होत नसल्याने मालवाहतूक सेवा ठप्प आहे, असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवा चार वर्षांपूर्वी राज्यभर सुरू केली होती. यासाठी दोन हजार जुन्या बसचे मालगाडीत रूपांतर करण्यात आले होते. वाजवी दर, खात्रीशीर सेवा आणि सुरक्षिततेमुळे या सेवेला खासगी आणि सरकारी कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
सुरुवातीला पुणे विभागात ७८ बसद्वारे मालवाहतूक सेवा सुरू होती. त्यामुळे दिवसाला १० ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. परंतु, सध्या पुणे विभागात मालवाहतूक बस उपलब्ध नसल्याने सेवा ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे एसटीच्या मालवाहतूक गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
परंतु, वरिष्ठांकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने फायद्यात असणारी मालवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. सुरुवातील ज्या बस उपलब्ध होत्या त्यातील काही बसेस स्क्रॅप झाले, तर काही मोडीत काढण्यात आल्या त्यामुळे एसटीची मालवाहतूक बंद करण्यात आला आहे, असे महामंडळाच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
खासगी मालवाहतुकीपेक्षा एसटीच्या मालवाहतुकीचे दर तुलनेने कमी होते. त्यामुळे पुणे विभागात १ मे २०२० रोजी सुरू केलेल्या एसटीची मालवाहतूक सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी विभागात ७८ गाड्या होत्या. त्यामुळे दिवसाला १० ते ११ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यानंतर यातील काही गाड्या मोडीत काढण्यात आल्या. परंतु , नव्याने गाड्या उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे या सेवेला मागणी असून देखील घरघर लागली होती.
पुणे विभागातील आकडेवारी
वर्ष फेर्या उत्पन्न
२०२१-२२ २ हजार ५९९ २ कोटी ३८ लाख
२०२२-२३ १ हजार ९२४ १ कोटी ९१ लाख
२०२३-२४ ८२६ ८७ लाख ३५ हजार





