वाघोली – देशाचे नेते शरद पवारांच्या पाठीमागे शिरूरचे खासदार आणि आमदार यांनी खंबीरपणाने साथ दिली आहे. आपली पक्षनिष्ठा सिद्ध करून दाखवली. लोकसभेला निवडून कसा येतो ही भाषा देखील काहींनी केली. कारखाना संकटात आला तरी देखील पवार साहेबांवरची निष्ठा अशोक पवारांनी सोडली नाही. खासदार अमोल कोल्हे यांना अनेक प्रलोभने दिली तरीदेखील त्यांनी पक्ष सोडला नाही. याच प्रामाणिक निष्ठेला शिरूर हवेलीकरांनी भरभरून साथ देत लोकसभेला शरद पवारांवरील प्रेम मताच्या रूपाने व्यक्त केले. अशीच निष्ठा रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी यापुढील काळात विधानसभेला दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. अष्टापुर तालुका हवेली येथील शिवशंकर मंगल कार्यालयात शिवस्वराज्य यात्रेच्या हवेली तालुक्यातील शुभारंभ प्रसंगी जयंत पाटील बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात बरीच राजकीय उलथापालथ झाली. आमदार, खासदारांच्या ओढाओढीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे या जिल्ह्यातील दोन माणसे ठामपणे उभी राहिली. एक डॉ. अमोल कोल्हे आणि दुसरे आपले आमदार अशोक पवार. या चुकीच्या मार्गावर आम्ही जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. सगळी प्रलोभने दिली गेली, दमदाटी करून झाली. मात्र तुम्ही विश्वासाने निवडून दिलेल्या आमदार आणि खासदारांनी आपली निष्ठा ढळू दिली नाही. अनेक साखर कारखान्यांवर मेहरबानी केली गेली, मात्र जे झुकले नाही त्यांना खड्यासारखे बाजूला केले गेले. अशोक बापूंच्या घोडगंगा कारखान्याला संकटात लोटण्याचे काम केले. त्यांना शिक्षा करताना शेतकऱ्यांना देखील शिक्षा केली. मात्र तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, आपले सरकार आले की कारखान्यावरील त्यायोगाने शेतकऱ्यांवरील अडचणी दूर करण्याचे काम आम्ही करू. अशोक बापूंचा पराभव करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब केला जाईल. मात्र आपण प्रचंड ताकद त्यांच्या मागे उभी करा की, ते थेट मंत्रीमंडळात जातील आणि या मतदारसंघाचा विकास साधतील. कोणाच्या दाढीला हात लावून नाही तर शरद पवार साहेब त्यांना सन्मानाने बोलावून मंत्रीपद देतील, हा विश्वास आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी जयंत पाटील यांनी सरकारच्या विविध योजना तसेच सरकारचे पक्ष फोडण्याचे धोरण, निधीचे अयोग्य वाटप आदीबाबत समाचार घेतला. यावेळी पूर्व हवेलीतील अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक पवार, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माणिकराव गोते, भारती शेवाळे, प्रदीप कंद, सुजाता पवार, सुनील गव्हाणे, प्रकाश म्हस्के, स्वप्निल गायकवाड, संदीप गोते, संजय भोरडे, योगेश शितोळे, सुरेखा भोरडे आदी गावातील आजी-माजी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्यासाठी संत महात्म्यांची भूमी असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवस्वराज्य यात्रेसाठी उपयुक्त असल्याने मतदारसंघातून या यात्रेची सुरुवात करण्यात आली. लाडकी बहीण म्हणणाऱ्या सरकारला लाडकी जनता दिसत नाही का हा खरा प्रश्न आहे. कोणी दाखवेल उज्जैन, कोणी दाखवील काशी, आमच्या अशोक बापूंची सेवा जनता जनार्दनाच्या पायाशी हे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील जनतेला माहित आहे. अशी खोचक टीका कोल्हे यांनी केली. तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीत अडीच वर्षे बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा फोटो छापण्यात आला आहे. यावरून सरकारची योजनेमधील विश्वासार्हता कमी होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या ठिकाणी कामाचे उद्घाटन होऊन देखील कामाला सुरुवात झाली नसल्याने जन सन्मान सरकारला ठेवता येत नसल्याचे कोल्हे यांनी सांगितले. मेहबूब शेख यांनी सांगितले की, बघून घेतो ची भाषा करणाऱ्यांनी महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प गुजरातला गेल्यावर काय केले? त्या ठिकाणी बघून घेतो ची भाषा का केली नाही? आमदार अशोक पवार सत्तेत सामील न झाल्याने त्यांना त्रास देण्याच राजकारण सत्तेतील लोकांनी केले आहे. याचा जाब विचारल्याशिवाय जनता राहणार नाही. घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पाडण्याचे षडयंत्र सत्तेतील लोकांनी केले असे महबूब शेख यांनी सांगितले. आमदार अशोक पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेला एका पैलवानास बांधकाम सभापती केले. काहींना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष पद देखील दिले. त्यांनी पक्षाचे विधानसभेला काम केले नाही. तरीही मी आजपर्यंत पक्षनिष्ठा सोडली नाही. आम्ही हवेली मार्केट कमिटी वेगळी केली. पण हवेली मार्केट कमिटी मध्ये आता भांडणे सुरू आहेत. मी शरद पवारांचा पाईक आहे. शेवटपर्यंत शरद पवारांचा पाईकच राहणार आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी शरद पवार साहेबांनी दोन वेळा मुख्यमंत्री यांची भेट घेऊन कारखान्याची बाजू मांडली आहे.