ओतूर, (वार्ताहर) – हिंजवडी, चाकण यासारख्या फार्मासिटिकल हब ठिकाणांचा उल्लेख करून कारखानदारी आता केंद्रित नको, तर ग्रामीण भागात सुद्धा कारखानदारीचे स्वरूप प्राप्त होईल यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डुंबरवाडी येथील शरदचंद्र पवार फार्मसी महाविद्यालयात शिक्षण महर्षी स्व. विलासराव तांबे (सर) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचा अनावरणाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न उत्तराचा एक अनोखा उपक्रम संस्थेचे सचिव वैभव तांबे आणि प्राचार्य डॉ. गणेश दामा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. या कार्यक्रमात पवारांच्या भरीव कामगिरीतून आय.टी तसेच एम.आय.डी.सी क्षेत्र महाराष्ट्रात अति वेगवान स्वरूप धारण करत असून फार्मासिटिकल इंडस्ट्री औषधनिर्माण शास्त्र कारखानदारी बद्दल शरद पवारांचे मत काय या मुलांच्या प्रश्नाला उत्तर देताना पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे, प्राचार्य डॉ. गणेश दामा आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक व परीसरातील सर्व पदाधिकारी, विद्यार्थी व शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, स्व. विलास तांबे सर यांच्या कार्याची चित्रफीत दाखविण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे यांनी देखील संस्थेचा आत्तापर्यंतचा शून्यातून ते एक यशस्वी संस्था या मधला खडतर प्रवास आणि चांगल्या व वाईट काळात शरद पवार यांची लाभलेली साथ यावर भाष्य केले. या शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आज शिक्षणाचा हा वटवृक्ष डुंबरवाडीच्या माळरानावर उभा आहे. या संकुलात संस्थापक अध्यक्ष स्व. विलास तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आपल्या हस्ते व्हावे, अशी सर्वांची इच्छा पूर्ण झाली आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले, असा आनंद आम्हाला झाला आहे. सदैव आपल्या ऋणात राहून अशी आभाळागत माया आमच्यावर कायम अशीच राहू द्या. – विशाल तांबे, अध्यक्ष, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ