राष्ट्रवादीला पुन्हा ‘बळ’; भाजपची होणार ‘पळापळ’

पुणे – अजित पवार हे पुणे जिल्ह्यात भाजपची कोंडी करत असल्याचे चित्र असतानाच; आता थेट त्यांनाच पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिचवड व जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळ मिळाले असून 2014 पासून पुणे जिल्ह्यात पाय रोवत असलेल्या भाजपची मात्र पळापळ होणार आहे.
सन 2014 नंतर भाजपने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका तसेच विधानसभांमध्ये यश मिळवले. त्यानंतर आता जिल्ह्यातील तीन लोकसभा ताब्यात घेण्याची तयारी सुरू असतानाच; अजित पवार यांच्या ताब्यात जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या गेल्याने भाजपच्या मनसुब्याबर पाणी फेरण्याची शक्यता आहे.
निवडणुका रखडल्याने 15 मार्च 2022 पासून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांसह, जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे. येथे सत्ता टिकवण्यासाठी भाजपला पालकमंत्रीपद हवे होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे ठेवले. त्यामुळे प्रशासक असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांना “डीपीडीसी’ तसेच महापालिकांमध्ये अडचणी येत नव्हत्या.
तसेच तातडीच्या कामासाठी पाटील यांच्याकडे दाद मागितली जात होती. पाटील हे देखील भाजप आमदार आणि माजी नगरसेवकांसोबत बैठकाही घेत होते. मात्र, आता चित्र उलटे असणार आहे. पाटील यांच्याकडे मंत्रीपदासह दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्याने त्यांना पुणे शहरासाठी जादा वेळ येणार नाही. परिणामी, मर्यादा येणार असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांची पळापळ होणार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी मागितली होती दाद
राष्ट्रवादी कॉंग्रेसला तडा देऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झालेल्या अजित पवार यांना अर्थ खाते देण्यात आले. तर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ठेवत भाजपने लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर समतोल साधला होता. मात्र, अजितदादांनी काही महिन्यांपूर्वी चंद्रकांत पाटील यांचेच प्रस्ताव अडवल्याने पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडेच दाद मागितली होती.





