उत्तर प्रदेशमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या समस्येला गांभीर्याने घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता रस्त्यावर फिरणारे भटके कुत्रे एखाद्या व्यक्तीला दोन वेळा चावले तर त्या कुत्र्यांना ‘जन्मठेपेची’ शिक्षा होणार आहे. हे माणसांना गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षेसारखेच आहे, पण कुत्र्यांसाठी अॅनिमल बर्थ कंट्रोल (एबीसी) सेंटरमध्ये आयुष्यभर राहावे लागेल. हा आदेश १० सप्टेंबर २०२५ रोजी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव अमृत अभिजात यांनी जारी केला असून, राज्यातील सर्व नगरपालिका आणि ग्रामीण संस्थांना त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास राज्यातील वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. या घटनांमुळे अनेकांना रेबीजचा धोका आणि इतर आरोग्य समस्या भेडसावत आहेत. याकडे लक्ष घालत सरकारने हिंसक आणि आक्रमक कुत्र्यांना शिस्त लावण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. या नियमांनुसार, भटक्या कुत्र्यांची प्राण्यांच्या कल्याणाचे नियम पाळताना सार्वजनिक सुरक्षेची काळजी घेतली जाईल. पहिल्या हल्ल्यासाठी 10 दिवसांची ‘शिक्षा’ या आदेशानुसार, जर एखादा भटक्या कुत्र्याने एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा चावले असेल (बिना कारणाने), तर त्या कुत्र्याला तात्काळ जवळील एबीसी सेंटरमध्ये नेले जाईल. तेथे तो १० दिवस निरीक्षणाखाली ठेवला जाईल. या कालावधीत कुत्र्याची वर्तनाची नोंद ठेवली जाईल आणि जर तो नसबंदी (स्टेरिलायझेशन) झालेला नसेल तर ती प्रक्रिया केली जाईल. १० दिवसांनंतर, कुत्र्याच्या शरीरावर मायक्रोचिप बसवली जाईल. ही चिप कुत्र्याच्या हालचाली आणि वर्तनाचे ट्रॅकिंग करण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यानंतर कुत्र्याला त्याच्या मूळ भागात सोडले जाईल. दुसऱ्या हल्ल्यासाठी ‘जन्मठेप’ जर तोच कुत्रा दुसऱ्यांदा एखाद्या व्यक्तीला चावला, तर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. यासाठी ३ सदस्यांची टीम नेमली जाईल, जी घटनेची तपासणी करेल. चौकशीत हल्ला बिना कारणाने झाल्याचे सिद्ध झाल्यास, त्या कुत्र्याला आयुष्यभर एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाईल. ही ‘जन्मठेप’ असणारी शिक्षा केवळ तेव्हाच माफ होईल जेव्हा एखादी व्यक्ती अधिकृतपणे त्याला दत्तक घेईल. दत्तक घेणाऱ्याला शपथपत्रावर सही करून आयुष्यभर काळजी घेण्याचे आणि रस्त्यावर सोडण्याचे वचन द्यावे लागेल. अटी आणि प्रक्रिया – पीडित व्यक्तीने सरकारी रुग्णालयात उपचार घेतले असतील तर त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यात अँटी-रेबीज लसीचा उल्लेख असावा. – हल्ल्यानंतर कुत्र्याला ताबडतोब एबीसी सेंटरमध्ये नेले जाईल आणि त्याचे निरीक्षण केले जाईल. – मायक्रोचिप बसवण्यामुळे भविष्यातील हल्ले रोखता येतील आणि कुत्र्याची ओळख पटवता येईल. – सर्व नगरपालिका संस्थांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रयागराज महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय आणि कल्याण अधिकारी डॉ. विजय अमृतराज यांनी सांगितले की, “या नियमांमुळे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळेल आणि नागरिकांची सुरक्षितता वाढेल. मात्र, प्राण्यांच्या कल्याणाचे नियमही पाळले जातील.”