राजगुरुनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; वकिलासह अनेक जण जखमी, नागरिकांमध्ये घबराट

रामचंद्र सोनवणे
राजगुरुनगर – शहरात भटक्या कुत्र्याने एका वकिलाच्या पायाला चावा घेतल्याने गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्या पायाला 10 टाके पडले असून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण पिंपरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ॲड. स्वप्नील जाधव असे कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वकिलांचे नाव आहे.
राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. अचानकपणे राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. नगर परिषद याकडे दुर्लक्ष करीत आहे. अनेक नागरिकांना पिसालेली कुत्री चावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजगुरुनगर शहरात दोन दिवसात तब्बल २० ते २५ नागरिकांना पिसाळलेले कुत्रे चावली आहेत. शाळकरी विद्यार्थी, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर चांडोली ग्रामीण रुग्णालय, यशवंतराव चव्हाण रुग्णालय यासह खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत ॲड स्वप्नील जाधव म्हणाले, ‘राजगुरुनगर शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. नगर परिषदेच्या हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिनाभरात २५० जण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी
राजगुरुनगर शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आहेत. एप्रिल पासून आतापर्यंत जवळपास एक हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर महिनाभरात जवळपास २५० जणांना पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्याची नोंद आहे. सध्या रॅबिपूर लस उपलब्ध असून, जास्त प्रमाणात जखम झाल्यास दिली जाणारी ‘इम्युनोग्लोबिलिन’ लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येते. – डॉ तेजश्री रानडे, वैद्यकीय अधीक्षक, चांडोली ग्रामीण रुग्णालय.





