पिंपरी | विकासाच्या नावाखाली वृक्ष संपदेची गळचेपी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी – चिंचवड शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत आहे. परंतु स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना पर्यावरणाची हानी होइल असा विकास करू नये. पिंपळे सौदागर येथील, पवना नदीवरील पुलाच्या कामासाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
पवना नदीवर बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला गती प्राप्त झाली आहे. परंतु उड्डाणपुलाचे काम चालू असताना, या मार्गावर अडथळा ठरणारे तीन ते चार जुने वृक्ष मुळासकट काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
एकीकडे झाडे लावा झाडे जगावा असा संदेश पालिकेच्या वतीने देण्यात येत आहे, परंतु पालिकाच या संदेशाची पायमल्ली करत आहे का ? असा सवाल ही नागरिकांनी उपस्थित केला आहे. यामुळे पवना नदी काठी असणारी जुनी वृक्ष संपदा नामशेष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पर्यावरणमित्रांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.





