अजबचं! झाडातून पाणी वाहू लागलं….; झाड रडतंय, कुणी म्हणालं या अमृतधारा! पिंपरी चिंचवडमधील प्रकाराची सर्वत्र चर्चा

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहराच्या प्रेमलोक पार्क, चिंचवड परिसरात शुक्रवारी रात्री काहीसं विचित्र पण ‘धो धो’ पद्धतीचं दृश्य पाहायला मिळालं. अचानक एका झाडातून पाणी वाहू लागलं आणि काही क्षणांतच या झाडाने सोशल मीडियावर ‘दैवी दर्जा’ मिळवला. कुणाला वाटलं – “झाड रडतंय”, कुणी म्हणालं – “हे अमृतधारा!”, तर काहींनी “देव पाण्याच्या रूपात अवतरलेत” अशीही श्रद्धेची टोकाची घोषणा केली.
घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि पाहता पाहता त्या झाडाभोवती भाविकांची गर्दी झाली. काही जणांनी झाडाला हार घातले, काहींनी हळद-कुंकू लावलं, तर काही श्रद्धावानांनी थेट तोंड, हातपाय धुवून घेत “हे पाणी लावल्याने डोकं शांत राहतं” असा आत्मविश्वास दाखवला. झाडाभोवती रांगोळ्या, गुलाल आणि सेल्फीची रांग लागली होती. “पाणी स्वतःहून झाडातून बाहेर येतंय, म्हणजे देव तरी झाडात, की झाडच देव?” हे कोडही उभ राहिलं.
दरम्यान, काही ‘पाणीदार’ सुजाण नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशामक दलाला दिली. पथक घटनास्थळी आलं, त्यांनी झाडातून पाणी वाहत असल्याचं पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात ‘चमत्कार’ नव्हे, तर ‘लीकेज’ होतं! त्यांनी तातडीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला.
पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संबंधित ठिकाणी आले. त्यांनी त्या परिसरातील पाणीपुरवठा बंद केला आणि क्षणार्धात झाडाचे ‘अश्रू’ थांबले. ही एकूणच ‘रडकं प्रकरण’ यामागचं खरं कारण हळूहळू बाहेर आलं. काही वर्षांपूर्वी त्या परिसरात भूमिगत पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यानंतर त्या जागेवर झाड उगवलं, पण झाड आतून किड्यांनी पोखरलं होतं. कालांतराने पाईप फुटला आणि पाणी झाडाच्या आतून वाट मिळेल तसं पाणी बाहेर येऊ लागलं. यालाच नागरिकांनी ‘दैवी चमत्कार’ समजून भाविकतेच्या पातळीत बुडवून टाकलं.
व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
https://www.facebook.com/reel/1388722045686843
या सर्व प्रकरणावर एका ज्येष्ठ नागरिकाने खोचकपणे सांगितलं, “हे बघा, श्रद्धा ठीक आहे, पण झाडातून पाणी आलं की आधी नळ तपासा. देवदर्शन होईल की नाही माहित नाही, पण पाणी गळती नक्की होईल!” थोडक्यात काय? – प्रेमलोक पार्कमधील ही झाडलीकेजकथा लोकांच्या श्रद्धेचा ‘ओव्हरफ्लो’ दाखवून गेली. चमत्काराची हौस ठेवलीच पाहिजे, पण कधी कधी त्याआड ‘पाइप’ही असतो हे लक्षात ठेवा.





